राष्ट्रवादी महिलांची ‘संविधान बचाव’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 10:26 PM2018-07-06T22:26:16+5:302018-07-06T22:26:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र व राज्यातील भाजप सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. देशातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस देशभर ‘संविधान बचाव, देश बचाव’ ही मोहीम राबवित असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
भाजप सरकारांच्या जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी आयोजित मोहिमेदरम्यान विभागनिहाय महिला मेळावे होत असल्याचे फौजिया खान म्हणाल्या. विदर्भातील पहिली विभागीय बैठक अमरावती येथे शुक्रवारी झाली. १७ जुलैला नागपूर येथे वसंतराव देशपांडे सभागृहात मेळावा होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहतील. या मेळाव्यानंतर ईव्हीएम व मनुस्मृती दहन केली जाईल. देश तसेच राज्यातील घडामोडी पाहता, व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आली असून, अघोषित आणीबाणी लादल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी अभियानाची माहिती दिली.
पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, शहराध्यक्ष सुचिता वनवे, सुषमा बर्वे, संगीता देशमुख, कल्पना बुरंगे, अनिता गावंडे, आशा गोट माधुरी शिंगणे, अरुणा गावंडे उपस्थित होत्या.
अभियंता भवनात बैठक... : ‘संविधान बचाव देश बचाव’ मोहिमेनिमित्त विदर्भस्तरीय मेळावा १७ जुलै रोजी नागपूर येथे होत आहे. नियोजनासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष फौजिया खान, आ. विद्या चव्हाण, राजलक्ष्मी भोसले, हर्षवर्धन देशमुख, शरद तसरे, वसुधा देशमुख, सुनील वºहाडे, राजेंद्र महल्ले यांच्या उपस्थितीत अभियंता भवनात नियोजन बैठक पार पडली. बैठकीचे आयोजन माजी प्रदेशाध्यक्षा सुरेखा ठाकरे यांनी केले होते.