कंपनीच्या रेल्वेलाईनमुळे शेतीला तलावाचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:16 AM2021-09-15T04:16:23+5:302021-09-15T04:16:23+5:30
फोेटो पी १४ नांदगाव नांदगाव पेठ : एका खासगी रेल्वे लाईनमुळे शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतीचे चक्क ...
फोेटो पी १४ नांदगाव
नांदगाव पेठ : एका खासगी रेल्वे लाईनमुळे शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतीचे चक्क दोन भाग झाले आहेत. शेतात पाणीच पाणी साचले असून गेल्या सहा वर्षांपासून शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी यांचेसह संबंधित अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांनी पत्रव्यवहार केला मात्र सहा वर्षात कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने अखेर १६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचाइशारा दिला आहे.
मौजे खानापूर शेतशिवारात शेत सर्व्हे क्र.५१/३,५२/५ मध्ये अपंग शेतकरी साहेबराव तुळे तसेच त्यांच्या बाजूला आशा बाळासाहेब तायडे यांचे शेत आहे. दरवर्षी शेतात पीक घेण्याचा शेतकरी प्रयत्न करतात मात्र बाजूला असलेल्या रेल्वे लाईन च्या बोगद्यामुळे पावसाचे सर्व पाणी या दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतात येऊन शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त होते.एवढेच नव्हे तर पाण्याच्या प्रवाहामुळे शेतीचे दोन भाग झाले आहेत दरवर्षी या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे दोन एक्करमधील पीक खराब होत आहे. याबाबत रतन इंडियासह जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तक्रार दिली. मात्र, या शेतकऱ्याच्या निवेदनाला केवळ केराची टोपली दाखविण्यात येत आहे.
साहेबराव तुळे आणि आशा तायडे या शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आता फुटलेला असून शेतकऱ्यांनी ‘करो वा मरो‘चा पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिला आहे. निवेदन देऊन दोन आठवडे झाले तरी प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नसल्याचे तुळे व तायडे यांनी माध्यमांना सांगितले.