नगरपालिकेला पोलीस छावणीचे स्वरुप
By admin | Published: October 30, 2015 12:23 AM2015-10-30T00:23:35+5:302015-10-30T00:23:35+5:30
निवडणुकीचा एकूण रागरंग ओळखून व तणावाची स्थिती उत्पन्न होऊ शकते, याची जाणीव झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्यामकांत म्हस्के ...
अमरावती : निवडणुकीचा एकूण रागरंग ओळखून व तणावाची स्थिती उत्पन्न होऊ शकते, याची जाणीव झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्यामकांत म्हस्के यांनी आधीच अतिरिक्त पोलीस कुमक देण्याची मागणी केली होती. त्यामुळे मतदान प्रक्रियेला सुरूवात होताच सकाळपासून नगरपालिकेला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. पालिका परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशानुसार नगरपरिषद परिसरात जमावबंदी कायदा ३७ (१) ३ लागू करण्यात आला होता. राज्य राखीव दलाची तुकडी देखील तैनात होती. निवडणुकीदरम्यान प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत वाद केल्याने स्थिती चिघळली. दगडफेक झाली. महिलांनी ठाणेदाराला धक्काबुक्की केली. दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. अखेर पोलिसांनी दोनवेळा लाठीमार केला.
‘प्रहार’ने अडविले वाहन
पक्षादेश झुगारुन ‘प्रहार’च्या काही नगरसेवकांनी मनीषा नांगलिया यांना समर्थन दिल्याने इतर कार्यकर्ते संतप्त झाले होते. यातूनच त्यांनी विरोधकांचे वाहन रोखण्याचा प्रयन केला. मात्र, सत्तारुढ नगरसेवकांनी त्यांना हुलकावणी देत सभागृहात पोहोचण्याची किमया साधली. निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या अमरावतीच्या फोटोग्राफरचा कॅमेरा पोलिसांनी हिसकावला. याची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली.
बाजार समितीच्या वाहनातून आगमन
प्रहार कार्यकर्त्यांनी मांडलेला उच्छाद आणि तणावपूर्ण वातावरण लक्षात घेता नवनिर्वाचित नगराध्यक्ष मनीषा नांगलिया यांना कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नंदकिशोर वासनकर यांनी बाजार समितीच्या वाहनातून नगरपालिका सभागृहात आणले. तेथून त्यांना पोलीस संरक्षणात नगराध्यक्षांच्या कक्षात नेण्यात आले.
प्रहार कार्यकर्त्यांची दगडफेक
विरोधकांना मतदानापासून रोखण्याकरिता प्रहार कार्यकर्त्यांतर्फे वाहनांवर दगडफेक करण्यात आली. टेम्पो ट्रॅव्हलर क्र. एम.एच.- २७-ए. ९९१३ च्या काचा फोडण्यात आल्यात. वाहनातील टिकू अहिर नामक व्यक्ती या दगडफेकीत गंभीर जखमी झाला. यावेळी पोलिसांवरसुध्दा दगडफेक करण्यात आल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी पौनीकर यांनी सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले.
‘त्या’ नगरसेवकांना पोलीस संरक्षण
प्रहारचे बंडखोर नगरसेवक गोपाल तिरमारे व मनोज लंगोटे यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. सत्तारुढ नगरसेवकांना पोलीस संरक्षणात नगराध्यक्षांच्या निवासस्थानावर पोहोचविण्यात आले होते. यावेळी चांदूरबाजार, परतवाडा, शिरजगावकसबासह आर.सी.पी.३ चे ७० कर्मचाऱ्यांसह ठाणेदार सतीशसिंह राजपूत व उपविभागीय पोलीस अधिकारी तैनात होते. याप्रकरणी पोलिसांनी मंगेश देशमुख यांच्यासह १६ लोक व ६० ते ७० महिलांवर भादंविच्या कलम ३५३, ३३२, ३३७, १४३, १४७, १४९. २९४ नुसार गुन्हे नोंदविले. एकूणच प्रकरणाबाबत आ. बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.