पोलीस ठाण्याला आले रेतीघाटाचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:26 AM2021-09-02T04:26:15+5:302021-09-02T04:26:15+5:30
पकडलेल्या वाळूचा ढीग, दोन महिन्यांपासून उभ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा मंगेश तायडे/नांदगाव पेठ : तहसीलदारांनी वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ...
पकडलेल्या वाळूचा ढीग, दोन महिन्यांपासून उभ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा
मंगेश तायडे/नांदगाव पेठ : तहसीलदारांनी वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केल्याने सर्व वाहने गेल्या अनेक दिवसांपासून नांदगाव पेठ पोलीस स्टेशनसमोर उभी आहेत. काही वाहनांमधील वाळू खाली करून ढीग पोलीस ठाण्यापुढे लावल्याने पोलीस स्टेशनला रेतीघाटाचे स्वरूप आले आहे. पोलीस ठाण्यासमोरच वाळूने भरलेली तब्बल आठ वाहने उभी असल्याने वरूड, मोर्शी मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. मोठा अपघात होण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रीय महामार्गावरून दररोज शेकडो कंटेनरमधून रॉयल्टीविना ओव्हरलोड आणि अवैधरित्या वाळूची वाहतूक होते. मध्यरात्री पोलीस आणि महसूल विभागाची नजर चुकवून होत असलेल्या या प्रकारावर तहसीलदार यांनी नजर ठेवून अनेक वाळू वाहनांवर कारवाई करून त्यांना लाखो रुपयांचा दंड ठोठावला गेला तसेच सर्व वाहने वाळूसह पोलीस ठाण्याबाहेर उभी करण्यात आली आहेत. काही वाहनांमधील वाळू चक्क पोलीस ठाण्याबाहेर उतरवून त्याचा ढीग लावला आहे. लाखोंचा दंड ठोठावल्याने वाळू वाहतूक करणाऱ्या मालकांनी न्यायालयात धाव घेतली असल्याचे बोलले जात आहे. जोपर्यंत वाळूमालक ठोठावलेला दंड भरत नाही किंवा तहसीलदार पुढील आदेश देत नाहीत, तोपर्यंत ही उभी वाहने व वाळू आहे त्याच अवस्थेत ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यासमोरून जाणाऱ्या प्रत्येकाला रेतीघाट येथे कसा, हा प्रश्न पडतो.
पोलीस ठाण्यासमोरून दररोज शेकडो वाहने मोर्शी, वरूड मार्गावर धावतात. परंतु, रस्त्यावर वाळूची वाहने उभी असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. न्यायालयीन प्रक्रियेमुळे पोलीस विभाग याप्रकरणी कोणतीही कार्यवाही करायला तयार नाहीत. परंतु, भविष्यात मोठी दुर्घटना झाल्यास याला जबाबदार कोण असणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.