पावसामुळे जंगलात संचारले नवजीवन
By admin | Published: June 20, 2015 12:36 AM2015-06-20T00:36:58+5:302015-06-20T00:36:58+5:30
पावसामुळे जंगलातील अन्नसाखळी सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.
पक्ष्यांसाठी खाद्य : वन्यप्राणी, कीटकांची सुप्तावस्था संपली
वैभव बाबरेकर अमरावती
पावसामुळे जंगलातील अन्नसाखळी सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. मुबलक खाद्यामुळे पक्षी, वन्यप्राणी व कीटकांची सुप्तावस्था संपली आहे. त्यामुळे जंगलातील जीवन सुखावले असून प्रफुल्लीत वातावरण निर्माण झाले आहे.
उन्हाळ्यात हिरवागार निसर्ग कोरडा पडू लागतो. तलाव व नैसर्गिक पाणवठ्यावरील पाणीसाठा संपुष्टात येतो. अशावेळी निसर्ग कात टाकत असल्याचे चित्र असते. मात्र, मान्सूनचा पाऊस पडताच निसर्ग पुन्हा हिरवागार दिसू लागतो. तसेच वन्यप्राणी व कीटकांच्या जीवनातील सुप्तावस्था संपायला लागते. आता मान्सूनचा पाऊस पडला असून पशू-पक्ष्यांसाठी अन्न व खाद्य मुबलक प्रमाणात मिळू लागले आहे. सुप्तावस्थेत गेलेल्या कीटकांनी पुन्हा जीवनाचा प्रवास सुरु केला आहे. कीटकांपासून वन्य प्राण्यापर्यंतची अन्नसाखळी निर्माण झाल्याने पुन्हा जंगल समृध्द झाले आहे. एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या प्रजातीची संख्या अचानक वाढू लागली आहे. उन्हाळ्यात सुप्तावस्थेत गेलेल्या कीटकांनी पाणी पडताच जीवनाचा प्रवास सुरु केला आहे. त्यांचे कोष पुन्हा सक्रिय झाले आहेत. गवतावर अवलंबून असणाऱ्या प्रजाती झपाट्याने वाढू लागल्या आहेत. मुंग्या, माकोडे व किड्यांची संख्या वाढल्याने पक्ष्यांनाही मुबलक प्रमाणात अन्न मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. उन्हाळ्यात बहुतांश पक्षी घरटी बांधतात व पावसाळा सुरु होताच त्यात अंडी देतात. पिल्ले निघाल्यानंतर त्यांनाही मुबलक अन्न मिळण्यास आता सुरुवात झाली आहे. फुलपाखरे, साप, बेडूक, सरडे, शेंद्री किडे, कोळी आदी कीटकांची संख्या वाढू लागली आहे. वृक्षवेली वाढू लागल्याने पक्षी व वन्यप्राण्यांनाही मुबलक अन्न मिळू लागले आहे. पावसामुळे जंगलातील जीवन प्रफुल्लीत झाल्याचा अनुभव अनेक निसर्गपे्रमींनी घेतला आहे.
पावसामुळे जंगलातील जीवनाचा प्रवास सुरळीत होण्यास मदत होत आहे. कीटक, पक्षी व वन्यप्राण्यांना मुबलक अन्न मिळाल्यावर त्यांच्या प्रजाती वाढू लागल्या आहेत. एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या प्रजातींमुळे जंगलाची सुप्तावस्था नाहीशी झाली आहे.
- यादव तरटे,
पक्षी अभ्यासक.
पाऊस पडताच लहान कीटकांपासून तर मोठ्या वन्यप्राण्यांची अन्नसाखळी सुरळीत होते. त्यांना मुबलक अन्न मिळल्यामुळे त्यांचा जीवनप्रवास सुरू होतो. पाणी व अन्न हेच जंगलातील जीवन फुलविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
- स्वप्निल सोनोने,
वन्यजीव अभ्यासक.