अंबा-एकवीरादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ; पहाटे ५.३० च्या मुहूर्ताला घटस्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 09:55 PM2018-10-10T21:55:55+5:302018-10-10T21:56:13+5:30
विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अंबानगरीत लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या अंबा-एकवीरादेवी मंदिरात बुधवारी ५.३० वाजताच्या मुहूर्तावर घटस्थापना करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अंबानगरीत लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या अंबा-एकवीरादेवी मंदिरात बुधवारी ५.३० वाजताच्या मुहूर्तावर घटस्थापना करण्यात आली. यानंतर नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी भाविकांनी अंबा-एकवीरादेवी मंदिरात अलोट गर्दी केली. रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा कायम होत्या. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
अंबादेवी संस्थानच्यावतीने घटस्थापना व अभिषेकाचा मान यंदा संस्थानचे सचिव दीपक श्रीमाळी यांना मिळाला. श्रीमाळी दाम्पत्याच्या हस्ते अभिषक करण्यात आला. यानंतर शारदीय नवरात्रोत्सवातील पहिली महाआरती भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी अंबादेवी संस्थानच्या अध्यक्ष विद्या देशपांडे, सचिव डॉ. अतुल आळशी यांच्यासह ट्रस्टींची उपस्थिती होती.
एकवीरादेवी संस्थानात घटस्थापना व अभिषेक संस्थेचे विश्वस्त शेखर कुलकर्णी दाम्पत्याच्या हस्ते झाले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष डॉ. रमेश गोडबोले व सचिव शैलेश वानखडे यांच्यासह विश्वस्त तसेच भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यानंतर दिवसभर विविध मंडळांकडून भजने, इतर आध्यात्मिक कार्यक्रमांसह चारूदत्त आफळे महाराज (पुणे) यांचे कीर्तन पार पडले. अंबादेवी संस्थानात सहा, तर एकवीरादेवी संस्थानात पाच पुजारी सेवेत राहणार आहेत, अशी माहिती डॉ. गोडबोले यांनी दिली आहे.