नवरदेव मांडवात आलाच नाही!
By admin | Published: March 22, 2016 12:22 AM2016-03-22T00:22:21+5:302016-03-22T00:22:21+5:30
पत्रिका वाटल्या, लग्नाचा दिवस आला, नातेवाईक जमले. मुहूर्तही टळला. मात्र, नवरदेव मांडवात आलाच नाही,...
नवरीने केली पोलिसांत अतिप्रसंग व फसवणुकीची तक्रार
अमरावती : पत्रिका वाटल्या, लग्नाचा दिवस आला, नातेवाईक जमले. मुहूर्तही टळला. मात्र, नवरदेव मांडवात आलाच नाही, असा प्रकार रविवारी सायंकाळी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. अखेर नवरदेवाची प्रतीक्षा करणाऱ्या नवरीने राजापेठ पोलिसांत नवरदेवाविरुध्द अतिप्रसंगाचा गुन्हा नोंदविला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. विश्वजीत पाटील (३५, रा.अकोला) असे आरोपीचे नाव आहे.
शहरातील एक तरुणी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन दिल्ली येथे सुरक्षा विभागात नोकरीला लागली. तेथून ती बदलीवर पुण्याला गेली. तेथे तिची ओळख इंजिनिअर विश्वजीत पाटील नामक तरूणाशी झाली. दोघांमध्ये प्रेमसूत जुळले. शारीरिक संबंधही झाले. त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांनी २० मार्च ही लग्नाची तिथी निश्चित केली. शहरातील एमआयडीसी मार्गावरील एका मंगल कार्यालयात लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले. वधू-वर पक्षाकडून लग्नसमारंभाची जय्यत तयारी सुरु झाली. अधूनमधून वधू-वरांचा दूरध्वनीवरून प्रेमालापही सुरू होता. नवरी मुलीला लग्नाच्या दिवसाची प्रतीक्षा होती. तो दिवस उजाडला. नवरीकडील सर्व मंडळींनी रविवारी मंगल कार्यालय गाठले. सकाळपासून वरातीची प्रतीक्षा सुरु झाली. दुपारचे १२ वाजून गेल्यानंतरही वरात आली नाही. नवरीने विश्वजीत पाटील याच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फोन ‘नॉट रिचेबल’ होता. वारंवार फोन करूनही असाच प्रकार झाल्याने नवरीच्या कुटुंबाचे धाबे दणाणले. तरीसुध्दा सायंकाळपर्यंत त्यांनी प्रतीक्षा केली. मात्र, नवरदेवाचा पत्ताच नव्हता. हतबल मुलीने सायंकाळी राजापेठ पोलीस ठाण्यात विश्वजीत पाटीलविरुध्द तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३७६, ४२० अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
प्रेमसंब’ंधातून दोघेही लग्न करणार होते. मात्र, नवरदेव लग्नाच्या दिवशी उपस्थित राहिला नाही. त्यामुळे मुलीने तक्रार नोंदविली आहे. त्यावरून आरोपीविरुध्द बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
- एस.एस. भगत,
पोलीस निरीक्षक, राजापेठ ठाणे.