नवीनचंद्रनेच केली स्वाक्षरी
By admin | Published: May 21, 2017 12:03 AM2017-05-21T00:03:29+5:302017-05-21T00:03:29+5:30
महापालिकेने दिलेले नाहरकत प्रमाणपत्र घनश्याम भंडारीच्या नावे असताना त्यावर नवीनचंद्रनेच स्वाक्षरी केल्याचा प्रकार तपासात निष्पन्न झाला आहे.
पॉवर आॅफ अटर्नीचा हवाला : घनश्याम भंडारीचे बयाण नोंदविले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेने दिलेले नाहरकत प्रमाणपत्र घनश्याम भंडारीच्या नावे असताना त्यावर नवीनचंद्रनेच स्वाक्षरी केल्याचा प्रकार तपासात निष्पन्न झाला आहे. शनिवारी नवीनचंद्रचा भाऊ घनश्याम भंडारीचे बयाण नोंदविण्यात आले. आपण नवीनचंद्रच्या नावे पॉवर आॅफ अटर्नी केली असली तरी, आपल्यातर्फे त्याने स्वत:चीच स्वाक्षरी करणे अपेक्षित होते. मात्र, नवीनचंद्रने आपल्या नावाचा गैरवापर का केला, याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचा दावा घनश्याम भंडारीने केला आहे.
शहर कोतवाली पोलिसांनी शनिवारी घनश्याम भंडारीला चौकशीसाठी पाचारण केले. त्यावेळी दिलेल्या बयाणात नवीनचंद्रची आणखी एक बनवेगिरी उघड झाली. महापालिकेतील नगररचना विभागाच्या सहायक संचालक कार्यालयातील नाहरकत प्रमाणपत्रावर चार पार्लरची बनावट नोंद केल्याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी दुबे आणि भंडारी या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तथापि घनशाम या लहान भावाच्या नावाचा नवीनचंद्रने गैरवापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले. अमरावती शहरात व्यवसाय करण्यासाठी, नाहरकत मिळविण्यासाठी आपण नवीनचंद्रला पॉवर आॅफ अटर्नी दिले होते. वेळोवेळी परभणीतून अमरावती येणे शक्य नसल्याने ते दिल्याचा दावा घनश्याम भंडारीने केला आहे. शुक्रवारी रात्री घनशाम भंडारी यांनी परभणीहून थेट कोतवाली ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक निलीमा आरज यांनी घनशाम भंडारीची चौकशी करून त्यांचे बयाण नोंदविले आहे.
फुलाडींची उलट तपासणी
अमरावती : आहे. तत्पूर्वी शुक्रवारी रात्री भंडारीच्या गणेश कॉलनीस्थित घरातून जप्त केलेल्या नोटरीची वस्तुनिष्ठता तपासण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात घनश्याम भंडारीच्या भूमिकेबाबत पोलिसांना संशय आहे. दुसरीकडे घनश्याम भंडारी हा गेल्या ११-१२ वर्षांपासून अमरावती शहरात नसल्याने त्याला न सांगताच नवीनचंद्रने हा प्रताप केल्याची शंका पोलिसांना आहे. त्या दिशेने पोलिसांनी चौकशी चालविली आहे. भंडारी व दुबे हे शासकीय दस्ताऐवजाची छेडछाड करत असताना फुलाडी हे लघुशंकेसाठी गेले होते. परत येताना ते दुबेशी हस्तांदोलन करताना सीसीटीव्हीत दिसतात. फुलाडींची ही वागणूक पोलिसाच्या लेखी संशयास्पद आहे. त्यामुळे पोलिसांनी फुलाडींची उलट तपासणी चालविली आहे. मनोरंजनाच्या नावावर नाहरकत देतेवेळी आर्थिक व्यवहार झाली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
नवीनचंद्रचे जिल्ह्यात तीन व्हिडीओ पार्लर
नवीनचंद्र भंडारीच्या मालकीचे शहर व ग्रामीण भागात तीन व्हिडीओ पार्लर आहेत. भाजीबाजारात चंद्रकात व्हिडीओ पार्लर, चांदूरबाजार व मोर्शी अशी तीन ठिकाणी हे पार्लर आहेत. या पार्लरला नाहरकत प्रमाणपत्र आहे किंवा कसे, याचा शोध पोलीस घेणार असून ग्रामीण भागातील या पार्लरची माहिती घेण्यासाठी शहर कोतवाली पोलीस ग्रामीण पोलिसांशी पत्रव्यवहार करणार आहे.
दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत
नवीनचंद्र भंडारी व अमित दुबे यांना कोतवाली पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तत्पूर्वी दोघांना २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
- तर सहआरोपी करू
हुक्का पार्लरच्या नावावर बनवेगिरीच्या या प्रकरणात महापालिकेच्या नगर रचना विभागाची एकूणच भूमिका संशयास्पद आहे. हुक्का पार्लरच्या परवागनीचा मुद्दा शहरभर गाजत असताना आपण मनोरंजनाच्या नावावर क्लब हाऊसला परवानगी दिलीच कशी, याचे समर्पक उत्तर आपण द्यावे, आपल्या अधिनिस्थ यंत्रणेने यात अर्थकारण केले असेल, तर स्पष्ट सांगावे, अन्यथा संबंधित कर्मचाऱ्यांनाही याप्रकरणात सहआरोपी करण्याची तंबी तपास अधिकारी लेवटकर यांनी सुरेंद्र कांबळे यांना दिली आहे.
मनोरंजनाच्या व्याख्येवर कांबळे निरुत्तर
महापालिकेच्या नगर रचना विभागाचे सहायक संचालक सुरेंद्र कांबळे यांचे शहर कोतवाली पोलिसांनी बयाण नोंदविले. कांबळे यांच्या स्वाक्षरीने घनशाम भंडारीच्या नावे मनोरंजन या घटकाअंतर्गत नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले. त्या अनुषंगाने तपास अधिकारी आर.एस.लेवटकर यांनी कांबळे यांचेकडून मनोरंजनाची व्याख्या जाणून घेतली. एखाद्या डॉन्सबारमध्ये मुली नाचत असतील तर, ते सुध्दा मनोरंजनच असते, मग महापालिकेची मनोरंजनाची व्याख्या नेमकी काय, अशी विचारणा कांबळे यांना करण्यात आली. मात्र, कांबळे त्यावर निरुत्तर झाल्याची माहीती लेवटकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. याबाबत पोलिसांनी शासन निर्णय आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीबाबत कांबळे यांना लेखी खुलासा मागितला आहे.
महापालिकेकडूनही चौकशी
या अनुषंगाने महापालिकेकडूनही चौकशी सुरु करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयात जाऊन बाहेरील व्यक्ती दस्ताऐवजांशी छेडछाड करतात. मात्र, त्यांना कोणीही हटकत नाही. तसेच या गैर प्रकारात अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे किंवा कसे, हे सुध्दा चौकशीदरम्यान तपासले जाणार आहे. त्यामुळे नगर रचना कार्यालयातील कर्मचारी सुध्दा संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.