नवनीत राणा यांचे पोलीस आयुक्तांवर शरसंधान; लोकसभा अध्यक्षांना पत्र, कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 11:27 AM2022-03-26T11:27:05+5:302022-03-26T11:38:26+5:30
पोलीस आयुक्तांच्या बेहिशेबी संपत्तीची ईडी, सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
अमरावती : अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह आणि महानगर पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्याकडून माझ्या विशेष अधिकाराचे हनन करण्यात आल्याचा आरोप करीत करीत खासदार नवनीत राणा यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलेल्या निवेदनातून शरसंधान साधले आहे.
अमरावतीच्या राजकीय वर्तुळात सध्या हा विषयाची जोरदार चर्चा आहे. तसेच पोलीस आयुक्तांच्या बेहिशेबी संपत्तीची ईडी, सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून खासदार, आमदार राणा दाम्पत्यांना फसविण्याचा कट रचण्यात आल्याचेही म्हटले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनात या विषयावर एक तास चर्चा झाली. लोकसभेत उपस्थित संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, खासदार नवनीत रवी राणा यांच्यासह विविध पक्षांचे वरिष्ठ खासदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावात येऊन पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्याद्वारे दाखल करण्यात आलेल्या खोट्या तक्रारींच्या आधारे आमदार रवी राणा व शहरातील निरपराध नागरिकांवर ३०७ सारखा खोटा गुन्हा दाखल केला. पोलीस आयुक्तांनी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला असून, त्यांच्या संपत्तीची ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी खा. राणा यांनी निवेदनातून केली आहे.
आपल्याला सराईत गुन्हेगारासारखी वागणूक दिली आणि आमदार रवी राणा व इतर प्रतिष्ठित नागरिकांविरुद्ध ३०७, ३५३ सारखे खोटे गुन्हा दाखल करून रात्री उशिरा घरी १०० ते १५० पोलिसांचा ताफा घेऊन घराची झाडाझडती घेतली, अशा गंभीर आरोप करीत या संपूर्ण प्रकाराची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांची लोकसभेत केली.
संसदीय कार्यमंत्र्यांनी नेमली चौकशी समिती
खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत केलेल्या या भावनात्मक निवेदनामुळे बहुतांश खासदारांनी आक्रमक भूमिका घेत खासदार राणा यांचे समर्थन केले. शेवटी संसदीय कार्यमंत्री यांनी या प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे अभिवचन सभागृहात दिले, अशी माहिती खा. नवनीत राणा यांनी दिली आहे.