Navneet Rana: मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान, घरातही शिरले पाणी, नेत्यांनी केली पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 04:47 PM2022-07-05T16:47:56+5:302022-07-05T17:11:57+5:30
मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे
मुंबई - मुंबईसह राज्यातीस अनेक भागात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. मुंबईसह कोकणात पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. खासदार नवनीत राणा यांच्या अमरावतीतही मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अमरावतीच्या तिवसालगत असलेल्या पिंगळाई नदीला पूर आलाय. या पुराच्या तडाख्यात अनेक घरे जलमय झालेत. नागरिकांच्या घराचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे, येथील लोकप्रतिनिधींनी तिवसा येथील घरांची पाहणी केली.
मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. तर, हजारो हेक्टरवरील शेतीदेखील पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. तिवसा मतदार संघातील नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान पूरस्थितीमुळे अनेकजण बेघर झाले असून उपासमारीची वेळ पूरग्रस्तांवर आली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली. तर, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी तिवसा तालुक्यात जाऊन पूरग्रस्त भागची पाहणी केली आहे. याशिवाय अमरावतीच्या अनेक भागात नुकसान असल्याने खासदार अनिल बोंडे हे देखील पाहणी दौऱ्यावर आहेत. नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करीत पीडितांना दिलासा देत आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे हे नुकसान असल्याने नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून आणि लोप्रतिनिधींकडून करण्यात येते आहे.