खा. नवनीत राणांचे वटसावित्री पूजन, 10 लाखाच्या कामाचेही केले भूमिपूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 01:40 PM2022-06-14T13:40:21+5:302022-06-14T13:43:09+5:30
वटसावित्री पूजन दिनानिमित्त नवनीत राणा यांनी अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील कळमगव्हाण येथे महिलांसमवेत वटसावित्रीचे पूजन केले.
अमरावती - सर्वत्र आज वटपौर्णिमेचा सण साजरा केला जात आहे. याच सणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेलं विधान चर्चेत आहे. तर, दुसरीकडे महिला भगिंनीकडून वडाच्या झाडाला फेऱ्या मारुन पतीच्या उदंड आय़ुष्याची प्रार्थना करण्यात येत आहे. अमरावतीच्याखासदार नवनीत राणा यांनीही वडाच्या झाडाला फेऱ्या घेत वटसावित्रीचे पूजन केले. यावेळी, आपले सण, संस्कृती जपणं ही आपलीच जबाबदारी असल्याचं राणा यांनी म्हटलं.
वटसावित्री पूजन दिनानिमित्त नवनीत राणा यांनी अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील कळमगव्हाण येथे महिलांसमवेत वटसावित्रीचे पूजन केले. राजकीय कामकाजाल निघण्यापूर्वी त्यांनी वटसावित्रीचे पूजन करुन आपली संस्कृती जोपासली आहे. यावेळी कळमगाव येथील खासदार निधीमधून दहा लक्ष रुपयाच्या रोडचे भूमिपूजन देखील त्यांच्याहस्ते करण्यात आले. एकीकडे राष्ट्रवादीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मी वटसावित्रीची पूजा कधीच केली नसल्याचे म्हटले आहे. तर, दुसरीकडे नवनीत राणा यांनी ही पूजा करत परंपरा जपल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
"वटपौर्णिमेनिमित्त अनेक महिला वडाला फेरे मारुन पुढचे सात जन्म हाच पती मिळू दे अशी प्रार्थना करतात. पण मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाहीत. माझ्या सासरच्या मंडळींनी देखील कधी आग्रह केला नाही वा माझ्या नवऱ्याने पण कधी हट्ट केला नाही. याबाबत मी भाग्यवान आहे. आपल्या समाजाला सत्यवानाची सावित्री फार लवकर समजली, पण ज्योतिबाची सावित्री अजून समजली नाही", असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. हेरवाडच्या धर्तीवर खडकवासला धायरीसह एकूण २९ ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदी करणारा ठराव मंजूर केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.