बेलोरा विमातळासाठी नवनीत राणांनी मागितला ५० कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:14 AM2021-09-03T04:14:13+5:302021-09-03T04:14:13+5:30
अमरावती : स्थानिक बेलोरा विमातळाला विकासकामांसाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केंद्रीय विमान वाहतूक ...
अमरावती : स्थानिक बेलोरा विमातळाला विकासकामांसाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे खा. नवनीत राणा व आमदार रवि राणा यांनी गुरुवारी दिल्ली येथे भेट घेऊन केली. विमानतळ विकासाकरिता पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचे सिंधिया यांनी मान्य केल्याचे खा. राणा यांनी सांगितले.
बेलोरा विमानतळाच्या उर्वरित कामे करणे अत्यावश्यक आहे. विकासकामाची पूर्तता करण्यासाठी ५० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. या विमातळासाठी खा. नवनीत राणा यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. अमरावती विभागाचे मुख्यालय आहे. याशिवाय अंबानगरी ही विदर्भाचे शैक्षणिक व सांस्कृतिक माहेरघर म्हणून ओळखले जाते. मेळघाटातील चिखलदरा हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. महानुभावपंथीयांची काशी असणारे रिद्धपूर, जैन बांधवांचे तीर्थक्षेत्र मुक्तगिरी, तुकडोजी महाराजांची कर्मभूमी मोझरी, गाडगे महाराजांची जन्मभूमी व निर्वाणभूमी, जगप्रसिद्ध श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळासोबतच नांदगावपेठ येथे पंचतारांकित एम.आय.डी.सी. असून अमरावतीचा कपडा व्यापार हा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे बेलोरा विमातळ हवाई वाहतुकीची सुरू होणे गरजेचे आहे. या बेलोरा विमानतळाचा फायदा लगतच्या अकोला, यवतमाळ व वाशिम, बुलडाणा जिल्ह्यालासुद्धा होऊ शकतो, असे खा. नवनीत राणा व आमदार रवि राणा यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या निदर्शनास आणून दिले व बेलोरा विमानतळ विकासासाठी ५० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. याबाबत केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी राणा दाम्पत्याच्या मागणीची दखल घेऊन ५० कोटीचा निधी मंजूर केल्याचे खा. नवनीत राणा व रवि राणा यांनी सांगितले.