नवनीत राणांची पतीच्याच पक्षाला सोडचिठ्ठी; भाजपाचे सदस्यत्व स्वीकारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 11:33 PM2024-03-27T23:33:54+5:302024-03-27T23:35:10+5:30
अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून नवनीत राणा २०१९ मध्ये खासदार बनल्या होत्या
मुंबई/अमरावती - महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षात भाजपाची खिंड लढवणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना अखेर भाजपाकडून लोकसभेचं तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. अमरावतील लोकसभा मतदारसंघात भाजपाने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध असून आमदार बच्चू कडू यांनीही स्पष्ट शब्दात विरोध दर्शवला आहे. तसेच, नवनीत राणांना पाडण्यासाठी काम करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, उमेदवारी जाहीर होताच नवनीत राणा यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.
अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून नवनीत राणा २०१९ मध्ये खासदार बनल्या होत्या. भाजपा-शिवसेना युती असताना, मोदींच्या लाटेतही नवनीत राणांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव करत अमरावतीची निवडणूक जिंकली. मात्र, यंदा राज्यातील राजकीय समिकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. नवनीत राणांच्या भूमिकेकडे व अमरावतीच्या जागेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात, आज भाजपाने अधिकृतपणे त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे, त्यांना भाजपाचे सदस्यपद स्वीकारावे लागणार आहे. त्यानंतरच, ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टीच्या सदस्यपदाचा आणि महिला कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी त्यांचे पती आमदार रवि राणा यांच्याच पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
''मी श्रीमती नवनीत रवि राणा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीच्या राष्ट्रीय महिला कार्यकारी अध्यक्ष पदावर कार्यरत होते, आज 27 मार्च 2024 रोजी मी युवा स्वाभिमान महिला कार्यकारी अध्यक्ष आणि प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आजपर्यंत पक्षाने मला जो सम्मान दिला, आणि मदत केली, त्यासाठी मी संपुर्ण युवा स्वाभिमान पार्टीला धन्यवाद देते,'' असा आशय नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रवि राणा यांना लिहिलेल्या पत्रात आहे. तसेच, कृपया आपण माझा राजीनामा स्वीकार करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
अमरावती - नवनीत राणांकडून पती रवि राणा यांच्या पक्षातील सदस्यत्वाचा राजीनामा pic.twitter.com/zIagJi9LfB
— Lokmat (@lokmat) March 27, 2024
दरम्यान, भाजपकडून नवनीत राणा यांना तिकीट जाहीर झाल्यामुळे आता त्यांचा भाजपात प्रवेश होईल. तसेच भाजपाचे प्राथमिक सदस्यपदही त्यांना स्वीकारावे लागणार आहे. त्यामुळेच, खासदार नवनीत राणा यांनी आपल्या जुन्या पक्षातील सदस्यत्वाचा आणि कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
बावनकुळेंनी नाकारलं होतं प्रवेशाचं वृत्त
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणा यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल दोन दिवसांपूर्वीच प्रतिक्रिया दिली होती. आज नागपूरात नमो युवा संमेलन आहे. नवनीत राणांचा कुठलाही पक्षप्रवेश होणार नाही. नवनीत राणा आणि भाजपाच्या सर्व मित्र पक्षांना आम्ही या संमेलनाला बोलावले आहे. नवनीत राणा यांना सुद्धा संमेलनाचा निमंत्रण दिले आहे इथे कोणताही पक्षप्रवेश नाही सहयोगी म्हणून ते येतील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. त्यानंतर, आता उमेदवारी जाहीर झाल्यामुळे लवकरच राणा यांचा भाजपा प्रवेश होईल हे निश्चित झालं आहे.