नवनीत राणांच्या वक्तव्याने विरोधकांच्या हाती कोलित; कडूंचाही भाजपला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 06:14 AM2024-04-12T06:14:25+5:302024-04-12T06:15:10+5:30
स्वकियांचे नो कमेंट : ‘ताना’ व्हायरल
अमरावती : महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या ‘बाहेरच्यांनी’ या वक्तव्याने चांगलीच राळ उठवून दिली आहे. ते प्रत्युत्तर भाजपलाच ‘टोला टाईप’ असल्याने झपाट्याने व्हायरल होत असून विरोधकांच्या हाती मात्र आयते कोलित सापडले आहे. नवनीत राणा या भाजपमध्ये आल्या आहेत. आज ना उद्या त्या रवी राणा यांना आदेश देतील, ते देखील भाजपमध्ये येतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी म्हटले होते. त्या संदर्भाने पत्रकारांनी नवनीत राणा यांना छेडले असता, मी स्वमर्जीने भाजपत आली. रवी राणा त्यांचा निर्णय घेतील. नवरा बायकोत बाहेरच्यांनी बोलू नये, अशी प्रतिक्रिया दिली. त्या प्रतिक्रियेने भाजपमधील अनेकांची पंचाईत केली आहे.
भाजपमध्ये येऊन आठ दिवस झाले नसताना आमचे प्रदेशाध्यक्ष नवनीत राणा यांच्यासाठी ‘बाहेरचे’ होतात, तर येथे त्यांच्या प्रचारात प्राणपणाने झोकून देणाऱ्यांचे काय, असा सवाल काही भाजपाईंचा आहे. याउलट नवनीत राणा यांचे बावनकुळेंना ‘बाहेरचे’ हे विशेषण विरोधकांना मुद्दा देऊन गेले आहे. त्यावर बावनकुळेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ती रिलिज करायला सांगते, असे भाजपच्या अमरावती लोकसभा प्रमुख निवेदिता चौधरी यांनी म्हटले आहे.
नवनीत राणा या बावनकुळेंच्या नव्हे तर इतरांनी जे भाष्य केले, त्यावर व्यक्त झाल्या. बावनकुळेंबाबत त्या अशा बोलूच शकत नाहीत. अपमान केला, असे मला अजिबात वाटत नाही. आमच्या टीममध्ये गोंधळ नाही.
-शिवराय कुलकर्णी, प्रवक्ते, प्रदेश भाजप
नवनीत राणांचा तो जुना स्वभाव आहे. ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ अशी त्यांची प्रवृत्ती आहे.
- यशोमती ठाकूर,
काँग्रेसच्या आमदार, तिवसा
आताच जर त्या बावनकुळेंना ‘बाहेरचे’ म्हणत असतील, तर भाजपचे आमदार, नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी तर केव्हाच बाहेरचे झाले आहेत. भाजपच्या कार्यकत्यांनी चिंतन मनन करण्याची गरज आहे.
-बच्चू कडू, प्रहारचे आमदार, अचलपूर