आजपासून नवरात्रौत्सव, गरब्यावर खाकीचा वॉच! दामिनी पथके वाढविली
By प्रदीप भाकरे | Published: October 2, 2024 01:41 PM2024-10-02T13:41:02+5:302024-10-02T13:42:00+5:30
Amravati : सोशल मीडिया पोस्टवरही सुक्ष्म नजर, सीपी ऑन रोड
प्रदीप भाकरे
अमरावती : गुरूवार ३ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात होत असून, शहरात ४९२ ठिकाणी दुर्गादेवी व १०२ ठिकाणी शारदादेवीची स्थापना केली जाणार आहे. यादरम्यान १२ ऑक्टोबरपर्यंत शहरात ६४ ठिकाणी गरबा कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. त्यातील सर्वाधिक २२ ठिकाणे ही राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. नवरात्रोत्सवावर शहर पोलिसांची करडी नजर असताना विशेषकरून गरबा कार्यक्रमावर खाकीचा करडा वॉच राहणार आहे. त्यासाठी पोलीस ठाणेनिहाय विशेष पथकासह दामिनी पथकेही वाढविण्यात आली आहेत. गरब्यावर सहा दामिनी पथकांचा वॉच राहणार आहे.
नवरात्र उत्सवात स्थापना व विसर्जन मिरवणूक व शोभायात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणेकरीता पोलीस आयुक्तालयातर्फे असामाजिक तत्वाकडून कोणताही उपद्रव होणार नाही याकरीता, दुखापतीचे गुन्हे, मारामारी, छेडखानीवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत सर्व ठाणेदार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुचित करण्यात आले आहे. नवरात्रौत्सवासाठी १०३ पोलीस अधिकारी व १३५० अंमलदार तैनात असतिल. शहरातील महत्वाचे चौक, गर्दीचे ठिकाणे, मिश्र व संवेदनशिल वस्तीच्या ठिकाणी फिक्स पॉईंटस लावण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेकरीता १२ सी आर मोबाईल, सहा दामिनी पथके, बीट मार्शल व डायल ११२ वी वाहने शहरात सतत गस्त करीत राहणार आहे. सोशल मिडियावरील पोस्टवर देखील सायबर पोलिसांचे २४ बाय ७ लक्ष असणार आहे.
ठाणे : दुर्गादेवी शारदादेवी गरबा
राजापेठ : ५९ ०५ २२
कोतवाली : २३ ०० ०७
खो. गेट : ५९ ०९ ०९
भातकुली : १९ २४ ००
गाडगेनगर : ८० ०६ ०६
वलगाव : ३१ २० ००
नागपुरी गेट: २६ ०२ ००
नांदगाव पेठ ४० १२ ०२
फ्रेजरपुरा: ७५ १८ १२
बडनेरा: ८० ०६ ०६
एकुण : ४९२ १०२ ६४
"शहरातील नवरात्रौत्सव सुरळीत व सुरक्षित होणेकरीता सर्व शासकीय विभागांना त्यांच्या अधिनस्त असलेली कामे करण्याकरीता पत्र व्यवहार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व प्रकारची दक्षता घेण्याची सुचना करण्यात आली आहे. गरबा कार्यक्रमावर विशेष लक्ष असणार आहे."
- नवीनचंद्र रेड्डी, पोलीस आयुक्त