नवतपाचा उकाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:23 PM2019-05-27T23:23:58+5:302019-05-27T23:25:18+5:30
सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेशाताच २५ मे पासून नवतपाला सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम जाणवत असून वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. कुलर निकामी ठरत असून घराबाहेर निघताच अंग घामाने डबडबून जात आहे. उन्हाच्या दाहकतेमुळे सायंकाळीही गरम लाटा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेशाताच २५ मे पासून नवतपाला सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम जाणवत असून वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. कुलर निकामी ठरत असून घराबाहेर निघताच अंग घामाने डबडबून जात आहे. उन्हाच्या दाहकतेमुळे सायंकाळीही गरम लाटा लागत आहे. यातून उकाडा किती याचा अनुभव येत आहे. अशात नवतपा आणखी किती भाजणार आहे याची धसकी सर्वांनी घेतली आहे. नवतपाचे हे दिवस एकदाचे निघून जावे याचीच सर्व वाट बघत आहेत.
तुर्तास धारणीचा पारा ४४ ते ४५ अंशावर पोहचला आहे. या तापमानात जीव कासावीस होऊ लागल्याने सर्वांनाच एक-एक दिवस जड होऊ लागला. त्यात उन्हाळ्याचा खरा महिना म्हणजे मे महिना असतो. मे च्या सुरूवातीपासूनच सूर्यदेवाने कोप दाखविला. त्यात महिन्याच्या शेवटी २५ मे पासून नवतपा सुरू झाला व तापमानाने हद पार केली. नवतपातील पहिल्या रविवारी रात्रीच्या वेळी अंगाला चटके लागायचे व उष्ण वारे वाहत असल्याचा अनुभव यंदा मिळाला. उन्हाचे चटके आजही लागत असल्याने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. कित्येक तर दिवसा बाहेर निघणे टाळत आहेत. यामुळे दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदी दिसून येते. सायंकाळी कसे तरी नागरिक दिवसभराचे काम आटोपायला निघतात. आता लोकांची सहनशीलता संपली असून कधी पाऊस पडतो व या उकाड्यपासून मुक्तता मिळते याची वाट सर्वच बघत आहेत. सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत घराबाहेर जाणे टाळावे, जायचेच असेल तर तोंड सुती कपड्याने बांधून घ्यावे, सुती व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, गॉगल घालावा, चप्पल न वापरता बुट वापरण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. धारणी तालुक्याचा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समावेश असताना चिखलदºया तापमानाचा पारा ४५ अंशावर गेल्याने मेळघाटचे पर्याावरण असंतुलित झाले आहे.
काय आहे नवतपा?
नवतपा म्हणजे सूर्य जेव्हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो, त्या कालावधीला नवतपा म्हणतात. हे नऊ दिवस असतात. ज्याची सुरुवात शनिवारी २५ मे पासून झाली आहे आणि ते ३ जूनला संपणार आहेत. नवतपा सुरू झाल्यापासून अंगाची लाहीलाही होत आहे. सकाळपासूनच उकाडा जाणवत असून रात्री उशिरापर्यंत उष्ण वातावरण आहे. रविवारी धारणीत कमाल ४४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.