'नवाब’ ‘कॅटल लिफ्टर’

By admin | Published: January 19, 2017 12:03 AM2017-01-19T00:03:43+5:302017-01-19T00:03:43+5:30

कळमेश्वर-कोंढाळीच्या जंगलातून स्थलांतरण करून पोहरा-मालखेड जंगलात आलेल्या नवाब वाघामुळे अन्य वन्यप्राणी सैरभैर झाले आहेत.

'Nawab' 'Catal Lifter' | 'नवाब’ ‘कॅटल लिफ्टर’

'नवाब’ ‘कॅटल लिफ्टर’

Next

वन्यप्राणी सैरभैर : शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा
वैभव बाबरेकर अमरावती
कळमेश्वर-कोंढाळीच्या जंगलातून स्थलांतरण करून पोहरा-मालखेड जंगलात आलेल्या नवाब वाघामुळे अन्य वन्यप्राणी सैरभैर झाले आहेत. कातलाबोडीतील वाघीणीचा हा छावा ‘कॅटल लिफ्टींग’मध्ये पारंगत असल्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांना जंगलात चराईकरिता नेऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
कातलबोडीतील वाघिणीचा दोन ते अडीच वर्षांचा छावा तब्बल १३५ किलोमीटरचे अंतर पार करून पोहरा-मालखेड जंगलात वास्तव्यास आला आहे. तो जंगलात मुक्त संचार करीत असून त्याचे अस्तित्व वनविभागाच्या टॅ्रप कॅमेऱ्यात कैद झाले आहे. शहराच्या सीमेपर्यंत तो फेरफटका मारत असल्याचे त्याच्या पायाच्या आढळलेल्या ठशांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे अमरावती-चांदूररेल्वे मार्गावरील जंगलातील नवाबच्या मुक्त संचाराने अन्य वन्यप्राणी अस्थिर झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने जंगलात गस्त वाढविली असून या गस्तीदरम्यान जंगलात अन्य वन्यप्राणी बेपत्ता झाल्याचे दिसून येत आहे. एरवी जंगलात दृष्टीस पडणारी निलगाय, हरिण, रानडुक्करांसह अन्य वन्यप्राणी दिसेनासे झाल्याचे वनकर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. वाघ आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जंगलात फिरत असल्याची चाहुल अन्य वन्यप्राण्यांना लागल्यामुळे या प्राण्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. शिवाय नवाब हा कातलबोडीत ‘कॅटल लिफ्टर’ म्हणून ओळखला जातो. नवाबने तेथील अनेक जनावरे फस्त केल्याचेही सांगण्यात येत आहे.
या जंगलाशेजारी अनेक गावे असून तेथील शेतकऱ्यांकडे पशूधनाची संख्या अधिक आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी जनावरांना जंगलात चराईसाठी नेल्यास त्यांच्यावर नवाबकडून हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जनावरांना जंगलात चराईकरिता सोडू नका, असे आवाहन वनविभागाने केले आहे. नवाबच्या दहशतीमुळे वन्यप्राणी तुर्तास शांत झाल्याचे दिसत आहे. वनविभाग अलर्ट असून बारीकसारिक हालचाली देखील टिपल्या जात आहेत.

हिलटॉप पॉर्इंटजवळ
चार बिबट
अमरावती-चांदूररेल्वे मार्गावरील हिलटॉप पॉईन्टजवळच नवाबच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. त्याच परिसरात तीन बिबटांचेही वास्तव्य सिद्ध झाले आहे. मंगळवारी वनविभागाला यापरिसरात बिबटांचे तीन छावे दृष्टीस पडले असून त्या परिसरात बिबट मादी असल्याचेसुद्धा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी जंगलात जाण्यापूर्वी वनविभागाची पूर्व परवानगी घेणे आता गरजेचे आहे.

नवाब वाघाचा जंगलात अधिवास सिद्ध झाला आहे. या वाघाच्या भीतीमुळे जंगलातील अन्य प्राणी दडून बसले असून जंगलातील गस्तीदरम्यान हा अनुभव आला आहे.
- एच.व्ही.पडगव्हाणकर,
वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळी

Web Title: 'Nawab' 'Catal Lifter'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.