'नवाब-शिवानी' शहराच्या सीमेवर
By admin | Published: January 16, 2017 12:04 AM2017-01-16T00:04:49+5:302017-01-16T00:04:49+5:30
कळमेश्वर-कोंढाळीच्या राखीव जंगलातून पोहरा-मालखेडच्या राखीव वनांत वाघाच्या जोडप्याचे अस्तित्व रविवारी स्पष्ट झाले.
वनविभाग धास्तावले : भवानी तलाव परिसरात नर-मादीच्या पायांचे ठसे
अमरावती : कळमेश्वर-कोंढाळीच्या राखीव जंगलातून पोहरा-मालखेडच्या राखीव वनांत वाघाच्या जोडप्याचे अस्तित्व रविवारी स्पष्ट झाले. वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत पाचशे क्वॉर्टर्सच्या सीमेवरील भवानी तलाव परिसरात नर-मादी वाघाच्या पायांचे ठसे आढळले आहेत. इतकेच नव्हे, तर या स्थलांतरित वाघांचे छायाचित्र देखील ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
पोहरा-मालखेडच्या राखीव जंगलात नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर-कोंढाळीच्या राखीव जंगलातून वाघाचे जोडपे आले आहे. ‘नवाब’ या नावाने परिचित असलेल्या वाघासोबत ‘शिवानी’ नावाची मादी देखील असल्याने वनविभागाच्या धास्तीत भर पडली आहे. डिसेंबर, जानेवारीच्या मध्यात पोहरा, वडाळी जंगलात दाखल झालेला ‘नवाब’ आता वडाळीच्या राखीव जंगलात ‘किंगमेकर’ म्हणून वावरत असल्याचे दिसते. कळमेश्वर ते वडाळी जंगलापर्यंतचा सुमारे १५० कि.मी. चा प्रवास करून वाघाचे जोडपे आल्याने वनविभागाने त्यांच्या संरक्षणासाठी विविध उपायोजना आखण्यास प्रारंभ केला आहे.
रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पोहरा तलाव, पाचशे क्वॉर्टस् परिसरमार्गे होत भवानी तलाव परिसरात वाघाच्या या जोडप्याच्या पायांचे ठसे आढळले आहेत. वाघ दरदिवसाला २५ कि.मी.चा प्रवास करु शकतो. मात्र ‘नवाब’, ‘शिवानी’ या जोडप्याने तब्बल १५० कि.मी.चा पल्ला गाठून नवा घरोबा शोधला आहे. पोहरा-मालखेड राखीव जंगलात वाघांचे जोडपे असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे वनविभागाने सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली आहे.
उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांनी पोहरा, मालखेड जंगलात रात्रंदिवस गस्त चालविली आहे. ट्रॅप कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली असून वाघांचे अस्तित्व शोधण्यासाठी ‘ईम्प्रेशन पॅड’चा वापर केला जात आहे. वाघांच्या अस्तित्वाबाबत वरिष्ठ दरदिवसाला वनकर्मचाऱ्यांकडून मागोवा घेत आहेत. पोहरा, मालखेड जंगलात महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेराद्वारे वाघांचा शोध घेतला जात आहे. रविवारी पाचशे क्वॉर्टर्सच्या सीमेलगत वाघांच्या पायांचे ठसे आढळल्याने ही बाब नागरी वस्तींसाठी धोकादायक मानली जात आहे.
वाघांचे संरक्षण करताना त्यांचे अस्तित्व शाबूत रहावे, यासाठी उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्या मार्गदर्शनात वडाळीचे वनाक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर, चांदूरेरल्वेचे अनंत गांवडे, वनपाल विनोद कोहळे, सदानंद पांतगे, राजेश घागरे आदी प्रयत्नशील आहेत. पोहरा, मालखेड जंगलात वाघांचे अस्तित्व सिद्ध झाल्याने एनजीओंचा धुमाकूळ वाढीस लागला आहे. (प्रतिनिधी)
शेती कुंपणात वीजप्रवाह सोडण्यास नकार
पोहरा, मालखेड जंगलात असलेल्या शेतीतील पिकांचे वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी कुंपणात विद्युत प्रवाह सोडला जातो. मात्र, या जंगलात वाघाचे जोडपे असल्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने कुंपणात विद्युत प्रवाह सोडू नये, यासाठी उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांनी शेतकऱ्यांना पत्र पाठवून अवगत केले आहे. वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यासोबत बैठक देखील होणार आहे. जंगलात ये-जा करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे.
वडाळी, मालखेड जंगलात 'ट्रॅप कॅमेरे' वाढविणार
वडाळी, मालखेड जंगलात वाघांचे अस्तित्व दिसून आल्याने त्यांच्या संरक्षणासाठी जंगलात ट्रॅप कॅमेऱ्यांची संख्या वाढविली जाणार आहे. तलाव, पाणवठे असलेल्या भागात ट्रॅप कॅमेरे बसवून वाघांच्या हालचाली टिपल्या जाणार आहेत. वाघांच्या संरक्षणासाठी वरिष्ठांकडून ट्रॅप कॅमेराद्वारे मॉनिटरिंंग केले जात आहे.
घाबरू नका, वाघ दिसल्यास वनविभागाला कळवा
नवाब हा शहरापासूनच्या पाच ते दहा किलोमीटर अंतरावरील जंगलात मुक्त संचार करीत आहे. अशाप्रसंगी जंगल मार्गाने जाणाऱ्या नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. वाघ दिसल्यास घाबरू नका, तो दिसल्यास तत्काळ वनविभागाला माहिती द्या, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
वाघांच्या पायांचे आढळलेले ठसे हे दोन वाघांचे असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु कॅमेऱ्यात एकच पट्टेदार वाघ कैद झाला आहे. त्यामुळे हे वाघांचे जोडपे असल्याच्या बाबीवर अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, वाघांच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
- हेमंत मीणा, उपवनसंरक्षक, अमरावती.
नवाब हा जिल्ह्यात पाहुणा आहे. तो येथील समृद्ध जंगलात आला आहे. त्याची सुरक्षा व काळजी घेणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे वनविभागासह सर्व स्वयसेवी संस्थांनी तसेच स्थानिक रहिवाशांनी या वाघाच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करायला हवेत.
- यादव तरटे,
वन्यजीव अभ्यासक, अमरावती