नायगाव रेतीघाटावर ट्रक पेटविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:03 PM2018-02-11T23:03:29+5:302018-02-11T23:03:51+5:30
तालुक्यातील नायगाव येथील रेतीघाटाच्या मालकाला खंडणी मागत शुक्रवारी रात्री सात ते आठ इसमांनी रेतीघाटावर हल्ला करून दोन झोपड्या व एक ट्रक पेटवून दिला तसेच शस्त्राचा धाक दाखवित मजुरांना मारहाण करण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील नायगाव येथील रेतीघाटाच्या मालकाला खंडणी मागत शुक्रवारी रात्री सात ते आठ इसमांनी रेतीघाटावर हल्ला करून दोन झोपड्या व एक ट्रक पेटवून दिला तसेच शस्त्राचा धाक दाखवित मजुरांना मारहाण करण्यात आली.
नायगाव रेतीघाटचे मालक मंगेश सदाशिवराव हजारे (रा. गोपालनगर, अमरावती) यांना ७ फेब्रुवारीला सायंकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान मोबाइलवरून अज्ञात व्यक्तीने स्वत:चे ‘किंग’ असे नाव सांगून ‘मी तुझ्या रेतीघाटावर गाडी पाठवतो, एक ट्रक भरून दे’ असे सांगितले. यावर मंगेश हजारेने या रेतीघाटाचा मी एकटा मालक नसून, त्यात इतरही भागीदार असल्याचे संगितले. यावर तू ऐकत नसशील, तर तुला पाहून घेईन, अशी धमकी देऊन किंगने फोन बंद केला.
यानंतर शुक्रवार, ९ फेब्रुवारी दुपारी १ वाजता मैनुलभाई (रा. तिवसा) हे एमएच २७ एक्स ६५२८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये दोन ब्रास रेती भरून घेऊन जात होते. त्याचवेळी सुदर्शन कटाने या रेतीघाट संचालकाने रॉयल्टीची सात हजार रुपये मैनुलभाई यांच्याकडून घेतले. तेव्हा लगेच सुदर्शन कटानेला फोन आला. सदर व्यक्तीकडून पैसा घेऊ नका. तुझ्या मालकाला पाच लाख तयार ठेवायला सांग. नाही तर तुझ्या मालकाला घाटात पाय ठेवू देणार नाही, अशी धमकी दिली.
या घटनाक्रमात याच दिवशी रात्री १२:३० चे सुमारास या नायगाव रेतीघाटावर तथाकथित किंग नावाच्या व्यक्तीने त्याच्या सात ते आठ साथीदारांसह हल्ला करून घटनास्थळावरील एक ट्रक तसेच मजुरांच्या झोपड्या आग लावून पेटवल्या आणि शस्त्राचा धाक दाखवून धमकावले व खंडणी मागितली. यामध्ये एकूण मुद्देमालासह ३ लाख ७० हजारांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नोंद आहे. याप्रकरणी मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत राऊत यांच्या मार्गदर्शनात आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे.