काँग्रेसवर नियंत्रणासाठी राष्ट्रवादीची ‘समिती’
By admin | Published: April 24, 2016 12:34 AM2016-04-24T00:34:50+5:302016-04-24T00:34:50+5:30
जिल्हा परिषदेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विकासकामांवरून धूसफुस सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेत धुसफूस : राष्ट्रवादीने केली समन्वय समितीची अनौपचारिक घोषणा
प्रशांत देसाई भंडारा
जिल्हा परिषदेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विकासकामांवरून धूसफुस सुरू झाली आहे. काँग्रेसच्या असहकार्याने त्रस्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सत्तेतील अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी नुकतीच बैठक बोलविली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व त्यांचे समर्थक जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. यात काँग्रेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अनौपचारिक समिती तयार केली आहे. समितीच्या माध्यमातून काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, सत्तेला एक वर्षाचा कालावधी लोटत नाही, तोच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विकास काम तथा जिल्ह्याच्या नियोजनात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करून न घेता एकहाती सत्ता असल्याच्या अविर्भावात काम सुरू केले. त्यामुळे सत्तेत असूनही काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना समानतेची वागणूक न देता अविश्वासाचे राजकारण करीत असल्याने मागील काही दिवसांपासून दोन्ही सत्ताधाऱ्यांमध्ये अंतर्गत धूसफुस सुरू आहे.
विकासकामांचे वाटप करताना दुय्यम वागणूक मिळत असल्याने अर्थसंकल्पीय सभा तथा या महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभेवर राष्ट्रवादी काँग्रेसने बहिर्गमन करून काँग्रेसला धारेवर धरले होते. यावरूनच त्यांच्यात अंतर्गत कलह असल्याचे दिसून आले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा असंतोष दूर करण्यासाठी काँग्रेसने मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘बुंद से गयी, वह हौद से नही आती’ या उक्तीनुसार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचा प्रस्ताव धूळकावला.
काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा असे होणार नाही, असे अभिवचन दिले. मात्र, काँग्रेसकडून पुन्हा डावलण्याचे षडयंत्र होऊ शकते, असे गृहीत धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, बाहेरून पाठिंबा देणारे शिवसेनेसह अन्य तीन सदस्य अशा १९ सदस्यांच्या बैठकीत काँग्रेसच्या भूमिकेचा कडाडून विरोध केला.
यावेळी काँग्रेसकडून पुन्हा विकासकामे असो किंवा अन्य कुठलेही कामे असो त्यात आपल्याला डावलणार नाहीत याची खबरदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची अनौपचारीक समिती बनविली आहे. ही समिती काँग्रेसच्या पदाधिऱ्यांच्या हालचालिंवर नजर ठेऊन कामांचे समसमान नियोजन व्हावे, यादृष्टिने प्रयत्न करणार आहे. काँग्रसवर नियंत्रणासाठी समिती तयार केली असली तरी, काँग्रेसचे पदाधिकारी त्यांना कितपत सहकार्य करतात, हे येणारा काळच सांगेल.