राष्ट्रवादी काँग्रेस महिलांना न्याय देणारे व्यासपीठ - सुरेखा ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 08:14 PM2019-11-21T20:14:15+5:302019-11-21T20:14:37+5:30
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय आढावा बैठकीत सुरेखा ठाकरे बोलत होत्या.
अमरावती : पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणा-या महिलांचा सन्मान करण्याचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी पक्षात रुजविले. त्याला अनुसरून अमरावती विभागातील महिलांनी जोमाने कामाला लागून आपापल्या कार्यक्षेत्रात दखलनीय कार्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश प्रभारी सुरेखा ठाकरे यांनी केले.
अमरावतीत गुरुवारी आयोजित राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय आढावा बैठकीत सुरेखा ठाकरे बोलत होत्या. व्यासपीठावर माजी मंत्री वसुधा देशमुख, प्रदेश कार्यकारणी सदस्य आशा मिरगे, वर्षा निकम, जिल्हाध्यक्ष अर्चना हरडे, संगीता ठाकरे, क्रांती धोटे, शुभदा नाईक, महानगरप्रमुख सुचिता वनवे आदी उपस्थित होत्या.
परतीच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी वर्ग संकटात आहे. सोबतच महिला बचत गट, शेतमजूर, महिला, युवती रोजगार आदी घटकांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांना न्याय मिळून देण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजितदादा पवार यांनी पुढाकार घेतला. त्याकरिता पक्ष संघटन मजबूत करून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला सारून सामाजिक कार्यास प्राधान्य दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येयधोरणानुसार ८० टक्के सामाजकारण आणि २० राजकारण यावर काम करावे, पक्षातील प्रत्येक महिला व युवतीचा खरा सन्मान करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. अमरावती विभागात महिलांचे संघटन अधिक मजबूत करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यादृष्टीने काम करण्याचा संदेश पक्षश्रेष्ठींचा आहे. महिला, युवती व अन्य कुठल्याही प्रश्नांबाबत अडचणी आल्यास त्यासाठी पक्षाचे नेते व पदाधिकारी कधीही आपल्यासोबत आहे, असा विश्र्वास सुरेखा ठाकरे यांनी बैठकीत दिला.
व-हाडात पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर
राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे संघटन राज्यभर मजबूत आहे. मात्र इतर भागाच्या तुलनेत विदर्भात विशेषत: पश्चिम विदर्भात राष्ट्रवादी महिला काँग्रेसला अधिक मजबूत करण्यावर प्रदेश महिला काँग्रेसचा भर आहे. त्याअनुषंगाने प्रदेश महिला काँग्रेसच्यावतीने विभागीय आढावा बैठक घेण्यात आली. दुसºया टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात महिला काँग्रेसच्या बैठकी घेऊन पक्ष संघटन मजबूत केले जाईल. या सर्व कामांचा आढावा पक्षनेत्या खासदार सुप्रिया सुळे प्रत्येक बुथ, तालुका आणि जिल्हास्तरावर घेणार आहेत. त्याअनुषंगाने राष्ट्रवादी महिला काँग्रेसने पूर्वतयारी सुरू केली आहे. सध्या राज्यातील राजकीय स्थिती लक्षात घेता महाशिवआघाडीबाबत चर्चा होत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जो निर्णय घेतील तो महिला काँग्रेसकडून त्यांचे स्वागत करणार असल्याचे सुरेखा ठाकरे व पदाधिकाºयांनी सांगितले.