समाजालाच मुख्य प्रवाहात आणण्याची गरज
By admin | Published: January 3, 2016 12:41 AM2016-01-03T00:41:29+5:302016-01-03T00:41:29+5:30
इतरांना पकडण्यासाठी समंस लागतो. मात्र पारधी समाजातील लोकांना पकडण्यासाठी कुठलाही समंस लागत नाही. येथे संपूर्ण जातीलाच गुन्हेगार ठरविले जाते.
गिरीश प्रभुणे : सामाजिक कार्यकर्त्यांचे मनोगत
अमरावती : इतरांना पकडण्यासाठी समंस लागतो. मात्र पारधी समाजातील लोकांना पकडण्यासाठी कुठलाही समंस लागत नाही. येथे संपूर्ण जातीलाच गुन्हेगार ठरविले जाते. त्यामुळे केवळ पारधी बांधवांना नव्हे, तर या समाजालाच घटनेच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी केले.
‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनाच्या शेवटच्या दिवसातील तिसऱ्या सत्रातील ‘आधारवड’ या संकल्पनेंतर्गत प्रभुणे बोलते झाले. तुळजापूर, सोलापूर, लातूर, मंगळवेढा या भागात पारधी बांधवांवर होणारे अनन्वित छळ सहन न झाल्याने ‘समरसता’ मंचाद्वारे यात स्वत:ला गुंतवून घेतले. आज समाज व्यवस्थाच विकृत झाली आहे. पुण्यातील गुरुकुलमध्ये अशाच गावकुसाबाहेरचे विद्यार्थी निवडले व काम सुरू झाल्याचे प्रभुणे म्हणाले.
प्रभुणे यांनी ‘सामाजिक समरसता’ मंचाद्वारे भटक्या विमुक्त जाती, विशेषत: पारधी जमातीसाठी केलेले काम, उपेक्षितांच्या प्रश्नांबद्दल समाजमन जागे करण्यासाठी त्यांनी दिलेल्या प्रयत्नावर निवेदकांनी प्रकाश टाकला. भटक्या विमुक्त समाजातील लहान मुलांवर आताच योग्य संस्कार केले तर पुढच्या पिढीत खूप मोठा बदल घडेल, असे मत प्रभुणे यांनी व्यक्त केले. भटक्या विमुक्तांसारखा समाजातील शेवटचा घटक अद्यापही स्थिर झालेला नाही. उद्ध्वस्त होण्यासाठीच आपला जन्म झाला, अशी भावना त्यांच्या मनात आहे, असेही ते म्हणाले.
तुळजापूर येथील पोलीस कोठडीमध्ये १३ वर्षांच्या पारधी समाजातील मुलीवर ८ जणांनी केलेला शारीरिक अत्याचार, चोर ठरवून दोन पारधी बांधवाची हत्या अशा घटना मनात खोलवर रुतून गेल्या, असा अनुभव त्यांनी सांगितला.
कोरकू समाज भीक मागत नाही - देशपांडे
मेळघाटातील आदिवासी सामर्थ्याच्या आधारे जगतो. तो कधी भीक मागत नाही, चोरी करीत नाही आणि खोटं बोलत नाही, तो आजही मूल्याधारित जीवन जगत असल्याचे मेळघाटातील सामाजिक कार्यकर्ते सुनील देशपांडे यांनी सांगितले. मेळघाटातील बहादा येथे बांबू केंद्र चालवून आदिवासी, त्यांच्या संस्कृतीशी समरस झालेल्या देशपांडेंनी आदिवासी संस्कृतीचे अंतरंग उलगडले. तेथे जातपंचायत नाही तर गाव पंचायत आहे. तेथे कुपोषणाची समस्या नाही तर आहाराची आवश्यकता आहे. समाजात समस्या नसते. केवळ सुविधेची वानवा असते, असेही देशपांडेंनी नमूद केले. देशपांडे दांपत्य अनेक वर्षांपासून बांबूपासून कलाकुसरीच्या वस्तुंची निर्मिती करून त्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
घटस्फोटाचा सल्ला
पत्नीला ‘स्क्रि झेफिनिया’ या मानसिक आजाराने ग्रासल्याचे सांगत संबंधित डॉक्टराने थेट घटस्फोटाचा सल्ला दिला व तेथून सामाजिक कार्याला सुरूवात झाली अशी आठवण कॅनडा येथील जगनाथवाणी यांनी अमरावतीकरांसाठी उलगडली. कॅनडामध्ये राहणारे जगन्नाथवाणी यांनी तेथील सरकारच्या मदतीने ‘मॅजिक फंड’च्या स्वरुपात दोन देशांना जोडणारे कार्य सुरू केले. कॅनडा सरकारच्या मदतीने भारतात ‘स्क्रि झोपेनिया’वर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली.