शांतता नांदण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
By admin | Published: August 24, 2016 12:04 AM2016-08-24T00:04:39+5:302016-08-24T00:04:39+5:30
देशात सतत या ना त्या कारणाने शांती भंग करणारे मूठभर असले तरी शांती नांदावी, या मताचे अनेक नागरिक आहेत.
जमाअते इस्लामी हिंद : देशात शांती, मानवता अभियानाला सुरुवात
परतवाडा : देशात सतत या ना त्या कारणाने शांती भंग करणारे मूठभर असले तरी शांती नांदावी, या मताचे अनेक नागरिक आहेत. ही शांती सद्भावना सतत नांदावी यासाठी आपण सर्वांनी अविरत प्रयत्न ठेवणे गरजेचे आहेत. जातीयतेची तेढ निर्माण करून आपली पोळी शेकणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. माणसाला माणूस बनविण्यासाठी कुठलेच पुस्तक किंवा अभ्यासक्रम नाही. ते आत्मसात करूनच माणूसपण मिळत असल्याचे प्रतिपादन उर्दू हिंदी मराठीचे गाढे अभ्यासक रफीक पारणेर यांनी केले.
देशभर २१ आॅगस्ट ते ४ सप्टेंबर २०१६ पर्यंत जमाअते इस्लामी हिंदतर्फे दरवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासह मोठ्या शहरामध्येसुद्धा सद्भावना फेरी, कविसंमेलन आदी कार्यक्रमांचा सहभाग असून त्यानिमित्त परतवाडा शहरात सोमवारी एका पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
पत्रपरिषदेला मतीन अचलपुरी, इब्राहिम साहेब अकोट, रफीक सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. समज गैरसमजातून दंगे होतात ते होऊ नये, मानवता जागावी, व्यसने सुटावी आणि आपल्या धर्माच्या शिकवणीचा आदर करीत सर्वत्र शांतता नांदावी, चांगले वातावण तयार होऊन सर्वांनी आनंदात जगावे, यासाठी मोठ्या प्रमाणात कायम प्रयत्न केले जात आहे. सर्वांनी मिळून त्यात सहभाग घेण्याचे आवाहन उपस्थितांनी पत्रपरिषदेत केले.
जवळपास तीन कोटी लोकांपर्यंत या पंधरवाड्यात पोहोचण्याचा मानस असून देशभर शांती आणि सद्भावनेचा संदेश देत कार्यक्रम साजरे केले जाणार आहे.
तुकोबांची गाथा, मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांचा संदेश, गीता, कुराणातील ओव्या सांगत एकतेसाठी हा मंच असल्याचे ते म्हणाले. उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक मो. जाकीर मतीन अहेमद, अलताफ रहमान, कमर इकबाल, अमिर इंजिनिअर, मो. जुबेर, जुबेर अहेमद खान, फराज अहेमद खान आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)