स्वाईन फ्ल्यूने महिला दगावली, प्रशासन उदासीन, स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 02:10 PM2017-10-01T14:10:49+5:302017-10-01T14:10:54+5:30
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मलकापूर येथे स्वाईन फ्ल्यूच्या संसर्गाने एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे.
वनोजाबाग / अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मलकापूर येथे स्वाईन फ्ल्यूच्या संसर्गाने एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे. शोभा विठ्ठल वानखडे (४५) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्यावर अंजनगाव, परतवाडा व नागपूर येथे उपचार करण्यात आले.
शोभाची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे तिला तालुका मुख्यालयातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान तिची प्रकृती खालावल्याने परतवाडा व नंतर नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शोभा यांच्या पश्चात तीन मुले आहेत.
स्वाईन फ्ल्यूमुळे महिलेच्या मृत्यूनंतर गावक-यांनी ग्रामपंचायतीच्या व आरोग्यासंदर्भातील कामांवर आक्षेप घेतला आहे. गावात अस्वच्छता असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जागोजागी सांडपाणी साचल्यामुळे त्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. साथरोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गावात आरोग्य सेवक पाहणी करीत नाही असा आक्षेप घेण्यात आला आहे. याकडे प्रशासनाने गांर्भीयाने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी गावक-यांनी केली आहे.