नीरज ककरानिया, अंशुल शेलोकार विज्ञानमध्ये अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 05:00 AM2022-06-09T05:00:00+5:302022-06-09T05:00:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. यात जिल्ह्याचा ९६.४१ टक्के निकाल लागला आहे. येथील केशरबाई लाहोटी वाणिज्य महाविद्यालयाची समृद्धी मुंधडा हिने ९८ टक्के गुण मिळवीत ‘टॉप’ आली, तर ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचा नीरज ककरानिया आणि धामणगाव रेल्वे येथील सेफला कनिष्ठ महाविद्यालयाचा अंशुल शेलोकार या दोघांनाही विज्ञान शाखेतून ९७.१७ टक्के गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून प्रथम आले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पहिल्यांदा बोर्डाने बारावीच्या परीक्षांचे नियोजन ऑफलाइन केले होते. विद्यार्थ्यांवरील परीक्षेसंदर्भातील ताण कमी करण्यासाठी ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षा बोर्डाने घेतली, तसेच ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटांचा वेळ, तर ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आला होता. त्यामुळे यंदा बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढली आहे.
जिल्ह्यामध्ये विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९९.१९ टक्के, वाणिज्य शाखेचा ९७.६०, तर कला शाखेचा ९४.०७ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्याच्या निकालात अपेक्षेप्रमाणे मुलांपेक्षा मुलींनी यंदाही आघाडी घेतली आहे.
३६७५३ विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा
जिल्ह्यात यावर्षी १९११७ मुले, तर १७६३६ मुली, अशा एकूण ३६७५३ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. यामध्ये १८२६१ मुले, तर १७१७५ मुली, असे एकूण ३५४३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा सर्वाधिक निकाल
जिल्ह्यात यंदा बारावीच्या निकालामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुका अव्वल असून, ९७.९९ टक्के निकाल जाहीर झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर चांदूर रेल्वे तालुका असून, ९७.९८ टक्के निकाल लागला, तर जिल्ह्यात सर्वांत कमी निकाल हा धामणगाव रेल्वे तालुक्यातील असून, ९३.३० टक्के निकाला जाहीर झाला आहे.
नीरजला
व्हायचंय डॉक्टर
नीरज ककरानिया हा ब्रजलाल बियाणी महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. विज्ञान शाखेतून ९७.१७ टक्के गुण प्राप्त करीत घवघवीत यश संपादन केले आहे. नीरजला त्याचे आजोबा मोतीलाल काकरानिया यांच्या इच्छेप्रमाणे डॉक्टर बनून रुग्णसेवा करायची आहे. नीरजने दहावीमध्येही ९७ टक्के गुण प्राप्त केले होते. नीरज आपल्या यशाचे श्रेय हे आई-वडील, तसेच शिक्षकांना देतो.
अंशुल करणार देश सेवा
धामणगाव रेल्वे येथील न्यू राठीनगर येथील रहिवासी अंशुल उमेश शेलोकार याने गणित विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविले. त्याचे वडील शिक्षक, तर आई स्मिता गृहिणी आहेत. अंशुल याला सैन्यात अधिकारी व्हायचे आहे. सेफला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश चांडक व प्राध्यापक वर्गामुळे यश मिळाल्याचे अंशुलने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.