कोरोनाग्रस्तावर उपचार करणाऱ्या धामणगावच्या ‘त्या’ डॉक्टरचा अहवाल निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 08:08 PM2020-04-09T20:08:03+5:302020-04-09T20:08:25+5:30
धामणगाव रेल्वे (अमरावती) : आठवडाभरापूर्वी अमरावती येथील एका इसमाचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. त्या इसमाची तपासणी करणा-या डॉक्टरचा ...
धामणगाव रेल्वे (अमरावती) : आठवडाभरापूर्वी अमरावती येथील एका इसमाचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. त्या इसमाची तपासणी करणा-या डॉक्टरचा कोरोनासंबंधी चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. मात्र, प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरीच राहण्याची गरज आहे.
अमरावती शहरातील हाथीपुरा भागातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यापूर्वी त्याने अमरावती येथील दोन खासगी डॉक्टरकडे उपचार घेतला होता. ज्या डॉक्टरने सर्वात आधी त्या कोरोनाबाधित इसमाची तपासणी केली होती, ते डॉक्टर धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. संबंधित डॉक्टरांनी स्वत:ला आयसोलेटेड करून घेतले होते. दरम्यान संबंधित डॉक्टरने धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात १ ते ३ एप्रिलदरम्यान तीन दिवस बाह्यरुग्णांची तपासणी केली होती. त्यामुळे त्यांच्या थ्रोट स्वॅबच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तो निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात ‘घरीच राहा व सुरक्षित राहा, असे आवाहन तहसीलदार भगवान कांबळे यांनी केले आहे.
संबंधित डॉक्टरचा कोरोनासंबंधीचा तपासणी अहवाल गुरुवार ९ एप्रिल रोजी प्राप्त झाला. तो निगेटिव्ह आला आहे.
- महेश साबळे, वैद्यकीय अधीक्षक