श्रीमंतांच्या वाहनाकडे दुर्लक्ष, गरिबाच्या रिक्षाकडे गेले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2016 12:19 AM2016-01-24T00:19:32+5:302016-01-24T00:19:32+5:30
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे हा पोलिसांच्या कर्तव्यांचा भाग आहे.
पोलीस कारवाईचा दुजाभाव : वृध्दाने उधार पैसे घेऊन भरले न्यायालयात
अमरावती : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे हा पोलिसांच्या कर्तव्यांचा भाग आहे. मात्र, कारवाई करताना श्रीमंतांच्या वाहनांकडे दुर्लक्ष करून गरिबांवर तत्काळ कारवाई केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशीच एक कारवाई शहर कोतवाली पोलिसांनी केली. एका वृध्द रिक्षा चालकाला १०० रुपयांचा दंड ठोठावला. त्या वृध्दाजवळ पैसे नसताना त्याने दुसऱ्याजवळून पैसे घेऊन न्यायालयात भरले. ही कारवाई समर्थनीयच आहे; तथापि अनेक चारचाकी आणि दुचाकीचालक नियमांचे खुलेआम उल्लंघन करीत असूनही त्याच्याकडे डोळेझाक केली जाते, हे वेदनादायी आहे.
कायदा हा सर्वासाठी सारखाच आहे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे, ही बाब सुध्दा महत्त्वाची आहे. तेव्हाच वाहतूक नियमांविषयी जनजागृती व नियम पाळण्याची सवय अमरावतीकरांना लागू शकते. मात्र, शहरातील बहुतांश मार्गावर चारचाकी महागडी वाहने सर्रास उभी राहतात. नोपार्किंगमध्येही श्रीमंतांची वाहने उभी केली जातात. अशी अनेक उदाहरणे शहरातील विविध ठिकाणी पाहायला मिळते. मात्र, मोठ्या वाहनावरील कारवाईचा आलेख हा कमी असल्याचेच आढळून आले आहे. त्यातुलनेत सर्वाधिक कारवाईचा बडगा दुचाकीस्वारांना सहन करावा लागत आहे. अशाच दुजाभावाचा प्रकार शुक्रवारी शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला. जयस्तंभ चौकात वृध्द रिक्षाचालक सुरेश दामोधर गोसावी (५७,रा. मांगीलाल प्लॉट) याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्यांना १०० रुपयांचा दंड ठोठावला. त्या रिक्षा चालकाजवळ दंडाची रक्कम भरण्यासाठीही पैसे नव्हते, त्यामुळे त्यांने एका अनोळखी युवकाजवळून घेऊन दंडाची रक्कम न्यायालयात जाऊन भरूनसुध्दा दिली. वाहतूक नियंत्रणाकडे पोलिसांचे लक्ष असल्याचेही सिद्ध होते. मात्र, शहरात असे शेकडो वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस पुढे येत नाही, असा प्रश्न या े उपस्थित झाला आहे. एका गरिब रिक्षावाल्याने वाहतूक नियम पाळला नाही, तो अज्ञानी असल्यामुळे त्यांच्या ती बाब लक्षात आली नसावी, मात्र, सज्ञान श्रीमंत नियमांचे ज्ञान असतानाही वाहतूक नियम तोडत आहेत, मात्र, तरीसुध्दा पोलीस त्याच्यावर कारवाईस दुर्लक्ष का करतात, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. (प्रतिनिधी)