नेहरूंनी जगभर ‘भिक्षा’ मागून देश जगवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:40 PM2017-11-13T22:40:16+5:302017-11-13T22:40:30+5:30
देशात टाचणी निर्माण होत नव्हती. सुतळीचा तोडा होत नसे. देशात अन्नधान्याचा तुटवडा होता. दर २० वर्षांनी या महाकाय देशात दुष्काळ पडत असे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देशात टाचणी निर्माण होत नव्हती. सुतळीचा तोडा होत नसे. देशात अन्नधान्याचा तुटवडा होता. दर २० वर्षांनी या महाकाय देशात दुष्काळ पडत असे. अशा विपरीत परिस्थितीवर मात करीत नेहरूंनी जगभर भिक्षा मागून हा देश जगवला, समृद्ध केला, विविध क्षेत्रात उत्क्रांती घडवून त्याची पायाभरणी केली, असे मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात एका व्याख्यानाप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ‘नेहरू नेमके कसे होते?’ या विषयावर बोलताना द्वादशीवार म्हणाले, टाचणीही निर्माण न होणाºया देशात रेल्वेचे इंजीन निर्माण व्हायला लागले. पोलदाचे मोठे कारखाने, हिरकुड, भाक्रा-नांगल यासारखी धरणे उभी राहिली. नेहरूंचे कार्य इथवरच थांबले नाही, तर या देशात नेहरूंनी लोकशाही रुजवली. नेहरूंची धर्मनिरपेक्षता मूल्यधिष्ठित, तर पटेलांची धोरणात्मक होती. देश स्वतंत्र झाला तेव्हा पंडित नेहरू ५८, तर सरदार पटेल ७२ वर्षांचे होते. पटेलांना हृदयविकाराचे दोन झटके येऊन गेले होते. मधुमेहाने त्यांचे शरीर जर्जर होऊन गेले होेते. त्याच्यावर पंतप्रधानपद लादणे योग्य नव्हते, असे द्वादशीवार यांनी स्पष्ट केले.