नेरपिंगळाई शेतकऱ्यांनी स्वखर्चाने साकारला पांदण रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:09 AM2021-06-23T04:09:45+5:302021-06-23T04:09:45+5:30

मोर्शी - तालुक्यातील नेरपिंगळाई या गावातील शेतकऱ्यांनी गारगोटी ते लालखडी हा अर्धा किलोमीटर पांदण रस्ता स्वखर्चातून व पूर्ण ...

Nerpingalai farmers pave the road at their own cost | नेरपिंगळाई शेतकऱ्यांनी स्वखर्चाने साकारला पांदण रस्ता

नेरपिंगळाई शेतकऱ्यांनी स्वखर्चाने साकारला पांदण रस्ता

Next

मोर्शी - तालुक्यातील नेरपिंगळाई या गावातील शेतकऱ्यांनी गारगोटी ते लालखडी हा अर्धा किलोमीटर पांदण रस्ता स्वखर्चातून व पूर्ण केला आहे.

शेतकऱ्यांना शेतावर जाण्याकरिता पांदण रस्ते आहेत. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्याची दैनावस्था झालेली आहे. गारगोटी ते लालखडी पांदण रस्त्याच्या दुरुस्तीची काही वर्षांपासून ग्रामस्थ मागणी करीत आहेत. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे कोणताही शासकीय निधी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपलब्ध न झाल्यामुळे नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत होते. गतवर्षी तीन म्हशी चिखलात फसल्याने जागीच ठार झाल्या होत्या. ट्रॅक्टर, बैलबंडी चिखलात अडकल्याच्या घटना घडल्या होत्या. अखेर शेतकऱ्यांनी शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता रस्ता दुरुस्त करण्याचा संकल्प केला व अर्धा किलोमीटरचा रस्ता श्रमदानातून तयार केला. अनिल बरवट व नीलेश डहाके या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मुरूम व दगड दिले. इतर शेतकऱ्यांनी श्रमदान व काही शेतकऱ्यांनी पैशांची मदत केली.या कार्यात मनोज रामेकर, अरुण पातुरकर, अनिल बरवट, विजय तव्वर,मदन तव्वर, नीलेश डहाके यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी परिश्रम घेतले.

रोजगार हमीच्या माध्यमातून आठ वर्षांपूर्वी या रस्त्याच्या कामाचे लाखो रुपये काढण्यात आले होते. या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

------------------

शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता असलेल्या मार्गावर अनेक वर्षांपासून अडचण निर्माण झाली. यासंदर्भात अनेकदा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. परंतु, कुणीच काही केले नाही. यामुळे आम्ही वर्गणी करून रस्त्याचे काम केले.

- मनोज रामेकर, शेतकरी

----------------

शेतात जाण्याचा मार्गच नसल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली होती. प्रशासनाने सहकार्य केले नाही. यामुळे म्हणून आम्ही शेतकऱ्यांनीच लोकवर्गणी गोळा करून रस्त्याचे काम केले.

- अरुण पातुरकर, शेतकरी

Web Title: Nerpingalai farmers pave the road at their own cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.