पृष्ठांच्या डब्यापासून साकारली चिमण्यांसाठी घरटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 10:28 PM2018-03-18T22:28:42+5:302018-03-18T22:28:42+5:30
कचऱ्याच्या स्वरुपात घरात पडून असलेल्या पृष्ठांच्या डब्यापासून चिमण्यांसाठी घरटे साकारण्याचे काम हेल्प फाऊन्डेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सुरु केले.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : कचऱ्याच्या स्वरुपात घरात पडून असलेल्या पृष्ठांच्या डब्यापासून चिमण्यांसाठी घरटे साकारण्याचे काम हेल्प फाऊन्डेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सुरु केले. त्याच्या या कार्यातून चिमण्यांना हक्काचे घरटे मिळाले असून या निसर्ग संवर्धनाचा उद्देश ठेऊन निशुल्क हे घरटे वितरीत केले जात आहे.
हल्ली चिमण्यांचा चिवचिवाट कमी झाला आहे. वाढत्या सिमेंटीकरणामुळे चिमण्यांना घरटे करण्यासाठी जागाच उरली नसल्याचे चित्र आहे. पूर्वी कुडाची व कौलांच्या घरात चिमण्या घरटे करून राहात होत्या. मात्र, आता ती स्थिती नसल्यामुळे चिमण्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. मात्र, या पक्षांना शहरी भागात अधिवास मिळावा, यासाठी काही निसर्गप्रेमी सातत्याने कार्य करीत आहे. हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष रत्नदीप वानखडे, विक्की गावंडे, शुभम गायकवाड, अक्षय होले, कौस्तुभ गाडे, श्रीकांत गावंडे, सुमेध गवई, पवन देशमुख यांनी चिमण्यांसाठी हक्काची घरटे तयारी केली आहेत. घरात पडून असलेल्या पृष्ठाच्या डब्याचे घरटे त्यांनी तयार केले आहेत. साध्या पृष्टाच्या डब्यांचा वापर करून चिमण्यांसाठी घरटे तयार केली आहे. ती घरटे निशुल्क वाटण्याचे काम संस्थेचे पदाधिकारी करीत आहे.
निसर्ग संरक्षणासाठी प्रत्येकाने थोडेफार योगदान दिल्यास निसर्गाचा समतोल टिकून राहील, अन्यथा सर्वानाच दुष्पपरिणामाला सामोरे जावे लागेल. चिमण्यांचे कृत्रिम घरटे तयार करून निसर्ग संवर्धनास हातभार लावणे आता गरजेचे आहे.
- रत्नदीप वानखडे,
अध्यक्ष, हेल्प फाऊन्डेशन