विणीच्या हंगामात घरट्यांची जडणघडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:12 AM2021-05-06T04:12:43+5:302021-05-06T04:12:43+5:30
अमरावतीला लाभले पक्ष्यांचे वैभव, झाडांची पाने, गवत, कोळ्याचे जाळे, कापसाचे धागे यांचा वापर अमरावती : एप्रिल ते सप्टेंबर हा ...
अमरावतीला लाभले पक्ष्यांचे वैभव, झाडांची पाने, गवत, कोळ्याचे जाळे, कापसाचे धागे यांचा वापर
अमरावती : एप्रिल ते सप्टेंबर हा कालावधी पक्ष्यांच्या विणीचा हंगाम असल्याने नाना तऱ्हेची घरटी व पक्षी आपल्या सभोवताल दृष्टीस पडतील. झाडांची पाने, गवत, कोळ्यांचे जाळे, कापसाचे धागे वगैरे साहित्य वापरून तयार केलेली ही घरटी व्यवस्थित शिवलेले असतात. अमरावती शहराच्या आसपास आढळणारे हे पक्षिवैभव हौशी पक्षिअभ्यासक मयुरेश वानखडे (रा. अर्जुननगर) यांनी उलगडले आहे.
पंचरंगी सूर्यपक्ष्याचा साधारणपणे मार्च ते मे हा विणीचा हंगाम काळ असतो. यांचे घरटे लांबट थैलीसारखे, झाडाला किंवा एखाद्या घराच्या आधाराने लटकणारे असते. सातपुड्याच्या दक्षिण भागात, श्रीलंका, बांगलादेश इ. ठिकाणी याचे वास्तव्य आहे.
टोई पोपट हा ३६ सेमी आकाराचा, मैनेपेक्षा छोटा पक्षी. प्लम हेडेड पॅरॅकिट असे इंग्रजी नाव. नराचे डोके निळसर लाल असते. वरची चोच पिवळी. शेपटी निळसर हिरवी व टोक पांढरे. काळी गळपट्टी. मादीचे डोके करडे असून, गळा व छातीचा वरचा भाग पिवळा असतो. शेपटीचे टोक पांढरे. टुई-टुई-टुई असा कर्कश्श आवाज करीत थव्याने वेगात उडतात. संपूर्ण महाराष्ट्रात जंगल आणि दाट झाडीच्या प्रदेशात आढळणारा हा पक्षी फळे, धान्य, फुलांमधील मकरंद यावर ताव मारतो.
एप्रिल ते सप्टेंबर या विणीच्या हंगामात शिंपी अर्थात हिंदीत दर्जी असे नाव असलेला पक्षी सर्वत्र आढळून येत आहे. कॉमन टेलरबर्ड असे त्याचे इंग्रजी नाव आहे. झाडांची पाने, गवत, कोळ्याचे जाळे, कापसाचे धागे वगैरे साहित्य वापरून तयार केलेले याचे घरटे व्यवस्थित शिवलेले असते, असे दिसून येईल.
जांभळा सूर्यपक्षी साधारणपणे मार्च ते मे या विणीच्या हंगामात लांबट थैलीसारखे, झाडाला किंवा एखाद्या घराच्या आधाराने लटकणारे घरटे गवत, कोळ्याचे जाळे, लाकडाचे छोटे तुकडे यांनी बनवतो. मादी एकावेळी दोन ते तीन राखाडी-हिरवट रंगाची व त्यावर तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. मादी एकटीच घरटे बांधण्याचे, अंडी उबविण्याचे काम करते. मात्र, पिलांना खाऊ घालण्याचे काम नर-मादी मिळून करतात.
वेडा राघू उष्ण कटिबंधातील बहुतेक सर्व देशांत आढळतो. मात्र, गेल्या काही वर्षांत याची संख्या खूपच रोडावली आहे. या प्रजातीतील इतर पक्षी (बी-इटर) पाण्याजवळ आढळतात, वेडे राघू मात्र पाण्यापासून लांबसुद्धा आढळतात. याशिवाय इतर पक्षीदेखील अमरावती शहराच्या आसपास आढळून येतात. पक्षिनिरीक्षणाचा छंद असणाऱ्यांनी त्यांच्या नोंदी घ्याव्या व निसर्गाशी समरस व्हावे, असे आवाहन मयूरेश वानखडे यांनी केले.