निव्वळ चर्चा; इडीचे पथक अंजनगावात पोहोचलेच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:17 AM2021-08-12T04:17:09+5:302021-08-12T04:17:09+5:30
अंजनगाव सुर्जी (अमरावती) : राज्याचे माजी गृहमंत्री यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ‘ईडी’ कडून चौकशी केली जात आहे. त्यासंबंधाने अंजनगाव ...
अंजनगाव सुर्जी (अमरावती) : राज्याचे माजी गृहमंत्री यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ‘ईडी’ कडून चौकशी केली जात आहे. त्यासंबंधाने अंजनगाव सुर्जी येथील अवसायनात निघालेल्या अंबादेवी साखर कारखान्यावर इडीने धाड टाकल्याचे वृत्त मंगळवारी चांगलेच व्हायरल झाले अन् अनेकांची पावले भंगारमय झालेल्या या कारखान्याकडे वळली. अनेकांनी आपली सूत्रे हलवली. जुने ‘सोर्स’ वापरले. मात्र, कुणीही इडीच्या धाडीला दुजोरा दिला नाही. तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनीदेखील कुणीही आले नाही, असे ठामपणे सांगितल्याने अनेकांची स्थिती ‘खोदा पहाड निकला चूहा’ अशी झाली. ईडीचे पथक अंजनगावात पोहोचलेच नाही.
अंबादेवी साखर कारखान्याच्या चौकशीकरिता ईडीचे अधिकारी येणार, या चर्चेला एकच उधाण आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. सहकार क्षेत्रदेखील ढवळून निघाले. या कारखान्याशी संबंधित एका सहकार नेत्यालादेखील संपर्क करण्यात आला. त्यांनी अनभिज्ञता दर्शविली. तरीही अनेकांनी साखर कारखानास्थळी धाव घेतली. अधिकारी थोड्या वेळाने येतील म्हणून वाट पाहत थांबले. परंतु, सायंकाळपर्यंत कुणीही साखर कारखान्यात फिरकले नाही. अनेकांना साखर कारखान्याची भव्य वास्तू आणि १०५ एकरात पसरलेले जंगल मात्र न्याहाळता आले.