नवीन ५५ महाविद्यालयांचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:22 PM2019-01-31T23:22:44+5:302019-01-31T23:23:08+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांमध्ये नवीन ५५ महाविद्यालये निर्मितीचा प्रस्ताव आहे. त्याअनुषंगाने कृती आराखडा तयार केला असून, बृहत आराखड्यात ही बाब नमूद केली आहे. सार्वत्रिक विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांमध्ये नवीन ५५ महाविद्यालये निर्मितीचा प्रस्ताव आहे. त्याअनुषंगाने कृती आराखडा तयार केला असून, बृहत आराखड्यात ही बाब नमूद केली आहे. सार्वत्रिक विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
महाराष्ट्र सार्वत्रिक विद्यापीठ कायदा २०१६ लागू झाला. यानुसार कामकाज चालणे अपेक्षित आहे. त्यानुसार कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठाचा बृहत आराखडा तयार केला असून, शासनाकडे मान्यतेसाठी पाठविले आहे. हा आराखडा विद्यार्थी केंद्रित तयार केला आहे. त्याअनुषंगाने अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांमध्ये सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात नव्याने ५५ महाविद्यालये निर्मितीचा प्रस्ताव आहे. संस्था चालकांकडून महाविद्यालये निर्मितीसाठी २८ प्रस्ताव आले आहेत. त्यापैकी १६ प्रस्तावाची छाननी करून ते मंजुरीसाठी शासनाकडे पाठविले. नवीन महाविद्यालये निर्मितीसाठी गावनिहाय लोकसंख्येचा आधार घेण्यात आला.
विद्यापीठात दोन नव्या विभागाला मान्यता
अमरावती विद्यापीठात नव्याने दोन विभाग निर्मित केले जाणार आहे. या विभागाला शासनाने मान्यता प्रदान केली आहे. या विभागाकरिता आवश्यक मनुष्यबळालाही मान्यता मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्यार्थी केंद्रीत अभ्यासक्रम या विभागात सुरू केले जातील, असे संकेत आहे.
पाचही जिल्ह्यांतून शैक्षणिक संस्थाचालकांकडून २८ प्रस्ताव प्राप्त झालेत. त्यानुसार अर्जाची छाननी करून १६ प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविले आहे. शासनाची मंजुरी मिळताच महाविद्यालयांची नव्याने निर्मिती केली जाणार आहे.
- राजेश जयपूरकर,
प्र-कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.