११५ वर्षांनंतर नवी इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 05:00 AM2020-07-18T05:00:00+5:302020-07-18T05:00:03+5:30
चांदूर बाजार पोलीस ठाण्याचे क्षेत्र ९० आर आहे. या जागेतील जुन्या इमारतीला लागून खुल्या जागेत ही नवीन इमारत उभारण्यात आली आहे. चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढता व्याप पाहता, नवीन इमारतीची आवश्यकता भासत होती. या इमारतीत ठाणेदार कक्ष, महिला व पुरुष आरोपींसाठी स्वतंत्र कोठडी तसेच संगणक कक्षासह गोपनीय विभागाचे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : चांदूरबाजार पोलीस ठाण्याच्या इंग्रज अदमानीतील इमारतीत सुरू असलेले कामकाज तब्बल ११५ वर्षांनी नव्या इमारतीत स्थानांतरित झाले आहे. १ कोटी ३२ लाख रुपयाची ही नवीन पोलीस स्टेशन ची इमारत उभारण्यात आली आहे. गुरुवारी नव्या इमारतीत पोलिसांचे कामकाज सुरू झाले.
तालुक्यात शंभर वर्षांपूर्वीची शासकीय कार्यालयाची एकमेव इमारत स्थानिक पोलीस ठाण्याची होती. १९०५ साली जुन्या इमारतीत कामकाज सुरू करण्यात आले. या इमारतीला ११५ वर्षांचा इतिहास लाभला. अनेक पावसाळे-उन्हाळे या इमारतीने सोसले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या इमारतीत पाणीगळती तसेच शिकस्त झालेल्या भिंतीचे पोपडे पडण्याच्या घटना घडल्या. जीर्ण पोलीस कोठडीसुद्धा धोकादायक असल्याचे पाहणीतून समोर आले होते. या गोष्टीची दखल घेत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शासनाकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ (मुंबई) यांच्याकडून १ कोटी ३० लाख रुपयांचा निधी दोन वर्षांपूर्वी मंजूर करून घेतला होता.
चांदूर बाजार पोलीस ठाण्याचे क्षेत्र ९० आर आहे. या जागेतील जुन्या इमारतीला लागून खुल्या जागेत ही नवीन इमारत उभारण्यात आली आहे. चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढता व्याप पाहता, नवीन इमारतीची आवश्यकता भासत होती. या इमारतीत ठाणेदार कक्ष, महिला व पुरुष आरोपींसाठी स्वतंत्र कोठडी तसेच संगणक कक्षासह गोपनीय विभागाचे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहे. हे सर्व बांधकाम सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे प्रभारी उपविभागीय अभियंता नीलेश चौधरी व मिलिंद भेंडे यांच्या देखरेखीत झाले. इमारतीचे काम पूर्ण होऊन बराच कालावधी झाला.
जुन्या इमारतीत पावसाळ्यात सगळीकडून पाणी गळत होते. यामुळे गुरुवारी या नवीन इमारतीत औपचारिक स्थानांतर सोहळा पार पडले. ठाणेदार उदयसिंग साळुंके यांनी नवीन इमारतीचे पूजन करण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक दीपक वळवी, जयश परीवाले, राजू म्हरसकोल्हे, शंकरलाल कास्देकर, राजपाल नाकाडे, भूषण पेठे, विनोद इंगळे, वीरेंद्र अमृतकर, निकेश नशीबकर, महिला पोलीस कर्मचारी नीता खुणे, योजना जितसह सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.