प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत रुग्णांच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:13 AM2021-05-22T04:13:30+5:302021-05-22T04:13:30+5:30
अरुण पटोकार फोटो पी २२ पथ्रोट पथ्रोट : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनांतर्गत ...
अरुण पटोकार
फोटो पी २२ पथ्रोट
पथ्रोट : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनांतर्गत साकारली गेली. त्यासाठी ५ कोटी ६० लक्ष रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. जुनी इमारत पाडून नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले. मात्र, ती पांढरा हत्ती ठरली आहे. आता पावसाळ्याचे दिवस पाहता नवीन इमारतीतून कामकाज सुरू व्हावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. साधनसामग्री व वीजपुरवठा करून नवीन इमारतीतून आरोग्य सेवा बजावावी, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
येथील पीएचसीत दोन वर्षांपासून एकही प्रसूती झालेली नाही. रात्री-अपरात्री तालुक्याच्या ठिकाणी महिलांना प्रसूतीकरिता नेण्यात येत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. १५ बाय १५ च्या खोलीत आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खोलीत कर्मचाऱ्यांना बसायलासुद्धा जागा नाही. रुग्ण तपासाकरिता योग्य टेबलही नाही. त्यात एखाद्या रुग्णाला सलाईन द्यायची असल्यास जागेअभावी तासभर थांबावे लागतात. पिण्यासाठी पाणी नाही. रुग्णांसाठी खाट नाही. महिला कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रसाधनगृह इतर भौतिक सुविधा नसल्याने अडीच वर्षांपासून कर्मचाऱ्यांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पावसाळ्यात या खोलीत पाणी गळते. तसेच या खोलीच्या बाजूला टिनाच्या छताखाली असलेला औषधीचा साठासुद्धा पावसाळ्यात भिजून जात असल्याचे चित्र दोन वर्षांत दिसून आले.
४६ गावे जुळलेली
पथ्रोट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावांची लोकसंख्या एक ते दीड लाखांच्या घरात आहे. एकूण ४६ गावांशी हे प्राथमिक आरोग्य केंद्र निगडित आहे. लहान मुलांना लस देण्याकरिता वेगळा कक्ष, रक्त तपासणी कक्ष, गरोदर तपासणी कक्ष, वैद्यकीय अधिकारी कक्ष, आरोग्य कर्मचारी कक्ष अशा सर्व सुविधा नवीन इमारतीत झाल्या आहेत. फर्निचर व अन्य लहान कामांसह साधनसामग्री त्वरित आणाव्यात व पीएचसीचे काम नवीन इमारतीतून व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.