नवीन इमारत न्यायदानासाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 10:25 PM2018-03-10T22:25:23+5:302018-03-10T22:25:23+5:30
येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवनिर्मित इमारतीचे दिमाखदार लोकार्पण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या हस्ते शनिवारी थाटात पार पडले.
आॅनलाईन लोकमत
अमरावती: येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवनिर्मित इमारतीचे दिमाखदार लोकार्पण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या हस्ते शनिवारी थाटात पार पडले. यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, खासदार, आमदारांसह विशेष मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय ठरली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया ताहिलरमाणी होत्या. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, प्रदीप देशमुख, सुनील शुक्रे, विजय आचलिया, पालकमंत्री प्रवीण पोटे, विधी व न्याय राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल पानसरे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे आदी उपस्थित होते. नव्या वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली. येथील सुविधांची माहिती जाणून घेतली. दरम्यान, पाहुण्यांसोबत बार असोसिएशनचे पदाधिकारी, जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती, अधिकारी व कर्मचाºयांचे फोटोसेशन झाले.
मुख्य सोहळ्याच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. स्वागतपर भाषण जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल पानसरे व संचालन सरकारी अभियोक्ता परीक्षित गणोरकर, सोनाली क्षीरसागर यांनी केले. यावेळी न्या. शरद बोबडे, न्या. विजया ताहिलरमाणी यांनी नवनिर्मित वास्तूचे भरभरून कौतुक केले. जिल्हा व सत्र न्यायालयाची अशी वास्तू राज्यात कुठेही नाही, असे गौरवोद्वार मान्यवरांनी काढले. शासनाने ही वास्तू साकारण्यासाठी ४७ कोटी ८३ लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा व सत्र न्यायालयाने आभार मानले. दरम्यान, न्यायमंदिराची वास्तू साकारणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक साळवे आणि इंदू कन्स्ट्रक्शनचे संचालक नितीन गभणे यांचा न्यायमूर्तींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सोहळ्याला खा. आनंदराव अडसूळ, आमदार सुनील देशमुख, रवि राणा, रमेश बुंदिले, अनिल बोंडे, माजी खासदार अनंत गुढे, माजी मंत्री वसुधा देशमुख, कमलताई गवई, प्रभाकरराव वैद्य, शंकरबाबा पापळकर, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक रमेश कांबळे, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांच्यासह उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, वकील संघाचे सदस्य, महिला वकिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या शानदार सोहळ्याचे नियोजन अभिनंदन इव्हेंट्स यांच्याकडून करण्यात आले. याप्रसंगी संचालक रीतेश वाढई यांनी न्या. शरद बोबडे यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले.
न्यायदानाच्या क्षेत्रात अमरावतीचे मोठे योगदान
अमरावती बार असोसिएशन ही सर्वात जुन्या बार असोसिएशनपैकी एक आहे. या बारच्या माध्यमातून राज्यघटनेला अभिप्रेत असलेले कायद्याचे राज्य महत्त्वाचे ठरले आहे. जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारे हे जिल्हा न्यायालय आहे. दादासाहेब खापर्डे, मुधोळकर, मोरोपंत जोशी, हबीलदास साटम, डॉ. पंजाबराव देशमुख, रा.सू. गवई, प्रतिभाताई पाटील यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी न्यायपालिकेच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. ही उच्च परंपरा कायम राखली जाईल, असा विश्वास न्या. शरद बोबडे यांनी व्यक्त केला.
जिल्हा वकील संघाचा सदस्य असल्याचा अभिमान
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांचा न्यायालयाच्या नवनिर्मित वास्तू साकारण्यात मोलाचा वाटा राहिला आहे. ते काही काळ जिल्हा न्यायालयाचे पालक सचिव होते. भूमिपूजन ते लोकार्पण या टप्प्याचे ते साक्षीदार आहेत. त्यापेक्षा जिल्हा वकील संघाचे सदस्य असल्याबाबतचा अभिमान असल्याचे न्या. गवई यांनी मार्गदर्शनातून स्पष्ट केले. याप्रसंगी न्यायालयाच्या नवनिर्मित वास्तूचे लोकार्पण झाले; आता पुन्हा जिल्हा वकील संघाची निवडणूक लढवू नका, असा चिमटा त्यांनी प्रशांत देशपांडे यांना घेतला.