महिला, बाल विकास योजनांचा अंमलबजावणीला नव्या भवनामुळे मिळेल गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:10 AM2021-06-29T04:10:05+5:302021-06-29T04:10:05+5:30
पान ४ साठी यशोमती ठाकूर यांचा विश्वास, महिला, बाल विकास भवनाची पायाभरणी अमरावती : महिला व बाल विकास योजना ...
पान ४ साठी
यशोमती ठाकूर यांचा विश्वास, महिला, बाल विकास भवनाची पायाभरणी
अमरावती : महिला व बाल विकास योजना राबविणारी सगळी कार्यालये एकाच छताखाली येण्यासाठी भवनाची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांसाठी महत्त्वाची सुविधा निर्माण होणार असून, योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी येथे केले.
गर्ल्स हायस्कूल परिसरात महिला व बाल विकास भवनाचे भूमिपूजन करताना ना. ठाकूर बोलत होत्या. जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख अध्यक्षस्थानी होते. माजी राज्यमंत्री आमदार प्रवीण पोटे, आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, महापौर चेतन गावंडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, जयंतराव देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा आदी उपस्थित होते.
महिला व बालविकास उपायुक्त, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, राज्य महिला आयोग व महिला आर्थिक विकास महामंडळ आदी कार्यालये या भवनात एकाच छताखाली असतील. या भवनासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महिला आयोगाचे विभागीय कार्यालयदेखील या इमारतीत असेल.
महिला व बाल विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा नियोजनात तीन टक्के तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कामांना चालना देण्यात येत असल्याचे ना. ठाकूर यांनी सांगितले. नागरी भागातही कुपोषणाची समस्या आहे. अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. लोकप्रतिनिधी व विविध स्तरातील मान्यवर, नागरिकांनीही कुपोषित मुलांच्या संगोपनासाठी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. प्रास्ताविक महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत थोरात यांनी केले.
00000