स्वाध्यायच्या नव्या अध्यायाला आठवडाभरातच लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:13 AM2021-05-25T04:13:29+5:302021-05-25T04:13:29+5:30

अमरावती : शाळाच बंद असतानाही विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी 'स्वाध्याय' उपक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र, उन्हाळी सुटीच्या काळात मुलांना ...

The new chapter of Swadhyay took a break within a week | स्वाध्यायच्या नव्या अध्यायाला आठवडाभरातच लागला ब्रेक

स्वाध्यायच्या नव्या अध्यायाला आठवडाभरातच लागला ब्रेक

Next

अमरावती : शाळाच बंद असतानाही विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी 'स्वाध्याय' उपक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र, उन्हाळी सुटीच्या काळात मुलांना अभ्यासात का गुंतवता, अशी ओरड झाल्यानंतर व प्राथमिक शिक्षक समितीने विद्या प्राधिकरणच्या संचालकांकडे १५ मे रोजी निवेदनाव्दारे केली होती. याची दखल घेत स्वाध्यायचा नवा अध्याय थांबविण्यात आला. हा उपक्रम आता पुढचे शैक्षणिक सत्रात सुरू केले जाणार आहे.

कोरोनामुळे वर्षभरापासून शाळा बंद आहेत. मुलांना शाळेत न येता कसे शिकविता येईल, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने व्हॉट्सअ‍ॅपव्दारे 'स्वाध्याय' उपक्रम हाती घेतला होता. यात दर आठवड्याला व्हॉट्सअ‍ॅपवर अभ्यासक्रम पाठविला जात होता. असे २४ आठवडे झाल्यावर शैक्षणिक सत्र संपल्यामुळे उपक्रमही बंद करण्यात आला. मात्र, परीक्षेविनाच मुलांना पुढील वर्गात पाठविण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे पुढील वर्षी मुलांना पुढच्या वर्गाचा अभ्यासक्रम शिकविण्यापूर्वी त्यांचा मागच्या वर्गाचा अध्ययनस्तर किती आहे, हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यात आला होता. १५ मे पासून स्वाध्यायचे स्वरूप बदलून त्यात पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात आले. त्यात गत वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित १५-२० प्रश्नांची लिंक पाठविणे सुरू करण्यात आले होते. मात्र, आता उन्हाळी सुटी सुरू असल्याने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी लाभला. शिवाय, कोरोनाच्या अन्य जबाबदाऱ्यांमुळे शिक्षकांनीही या उपक्रमाला विरोध केला. याबाबत शिक्षक समितीने शिक्षण संचालकांकडे निवेदन सादर केले होते. त्याची दखल घेत आता या उपक्रमाला तूर्तास ब्रेक लागला आहे. या उपक्रमात दर शनिवारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेला लिंक पाठविली जात होती. नंतर ही लिंक बीईओंच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविली जात होती. मात्र, २१ मे रोजी या उपक्रमाचा २५ वा आठवडा संपल्यानंतर २२ मे रोजी २६ व्या आठवड्याची लिंकच पाठविण्यात आलेली नाही. त्याऐवजी उपक्रम थांबविल्याचा संदेश मिळाला. शाळांना सुट्या असल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी असून, पुढील सत्र सुरू झाल्यावरच स्वाध्याय उपक्रम सुरू करता येईल, असे या संदेशात परिषदेने स्पष्ट केले आहे.

कोट

सध्या मुलांना उन्हाळ्याची सुटी आहे. अशातच सुट्यांची मानसिकता व कोरानाचा वाढता संसर्ग लक्षात घेता स्वाध्याय उपक्रम थांबविण्याची मागणी शिक्षक समितीने केली होती. याची दखल घेत हा उपक्रम थांबविण्यात आला आहे.

- राजेश सावरकर,

राज्य प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

Web Title: The new chapter of Swadhyay took a break within a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.