वादग्रस्त डीएफओच्या चौकशीसाठी पुन्हा नवी समिती, मुख्य वनसंरक्षकांचा निर्णय
By गणेश वासनिक | Published: February 23, 2024 09:51 PM2024-02-23T21:51:02+5:302024-02-23T21:52:07+5:30
आता आठ सदस्यांचा समावेश, जुनी गठित चौकशी समिती गुंडाळली, वनमंत्र्यांनी घेतली दखल
गणेश वासनिक, अमरावती: वन विभागाच्या अमरावती प्रादेशिकचे वादग्रस्त उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा यांच्यावर एका महिला आरएफओंनी गंभीर आरोप केल्यानंतर मिश्रा यांच्या चौकशीसाठी मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांनी पाच सदस्यीय समिती गठित केली होती. या समितीचे कामकाज शून्य असल्याचे लक्षात येताच आता पुन्हा आठ सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीत स्वत: सीसीएफ बॅनर्जी आहेत.
महिला आरएफओ यांनी १० फेब्रुवारी २०२४ रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर यांच्याकडे पाठविलेल्या तक्रारीत डीएफओ अमितकुमार मिश्रा यांच्या कारनाम्याची यादीच सादर केली. एवढेच नव्हे तर आरएफओ संघटनेच्या शिष्टमंडळाने सीसीएफ जयोती बॅनर्जी यांची भेट घेत निवेदनाद्वारे डीएफओ मिश्रा यांच्याविषयी चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार सीसीएफ बॅनर्जी यांनी १४ फेब्रुवारी रोजी पाच सदस्यीय समिती नेमली. मात्र या समितीने डीएफओ मिश्रा यांची चौकशी करण्यास नकार दिल्याची माहिती आहे. कारण डीएफओंची चौकशी डीएफओ हाच मुळात प्रश्न उद्भवला होता. मात्र हे प्रकरण अंगलट येण्याचे दिसून येताच सीसीएफ बॅनर्जी यांनी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी आठ सदस्यीय असलेली नव्याने चौकशी समिती गठित केली आहे. या समितीत स्वत: बॅनर्जी असल्यामुळे तक्रारकर्त्या महिला आरएफओंना न्याय मिळण्याची शक्यता आहे.
अशी आहे नवीन आठ सदस्यीय चौकशी समिती
डीएफओ मिश्रा यांच्यावर असलेल्या आरोपाच्या चौकशीसाठी नवीन आठ सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्ष सीसीएफ जयोती बॅनर्जी या आहेत. तर सदस्य म्हणून गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक सुमंत साेळंके, अकोला प्रादेशिकचे उपवनसंरक्षक कुमारस्वामी एस.आर., चिखलदरा वन प्रशिक्षण संस्थेच्या संचालक मुक्ता टेकाडे, विभागीय वन अधिकारी (दक्षता) किरण पाटील, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे आरएफओ योगेस तापस, मेळघाट वन्यजीव आरएफओ प्रीती आसोलकर, निर्देशन विभागाचे प्रशासकीय अधिकारी पी. आर. गुंडलवार यांचा समावेश आहे.