नव्या सीपींना दुचाकी चोरट्यांची सलामी !
By admin | Published: January 16, 2016 12:10 AM2016-01-16T00:10:46+5:302016-01-16T00:10:46+5:30
मागील सहा महिन्यांपासून दुचाकी चोरट्यांनी मांडलेल्या उच्छादाने अमरावतीकर हैराण झाले आहेत. दुचाकी घेऊन बाहेर पडलेल्या प्रत्येकाला वाहनाच्या सुरक्षिततेची चिंता सतावू लागली आहे.
चोर निर्ढावले : एकाच दिवशी सात वाहने लंपास
प्रदीप भाकरे अमरावती
मागील सहा महिन्यांपासून दुचाकी चोरट्यांनी मांडलेल्या उच्छादाने अमरावतीकर हैराण झाले आहेत. दुचाकी घेऊन बाहेर पडलेल्या प्रत्येकाला वाहनाच्या सुरक्षिततेची चिंता सतावू लागली आहे. २४ तासांत तब्बल ८ दुचाकी चोरीच्या घटनांची झालेली नोंद निर्ढावलेल्या दुचाकी चोरट्यांनी नव्या पोलीस आयुक्तांना दिलेली सलामीच आहे, असे म्हटल्यास गैर ठरू नये. अमरावतीची जनता ‘त्राही माम्’ करीत नवनियुक्त पोलीस आयुक्तांकडून दुचाकी चोरट्यांवर अंकुश लावण्याची आस धरून आहेत. १ ते १४ जानेवारी या कालावधीत तब्बल २९ दुचाकी चोरीला गेल्या आहेत, यावरून या प्रकाराचे गांभीर्य लक्षात येईल. सुमारे ८ लाख लोकसंख्या आणि १० पोलीस ठाण्यांचा आवाका असलेल्या शहर पोलिसांचे ‘मुखिया’ म्हणून शुक्रवारी दीर्घानुभवी दत्तात्रेय मंडलिक यांनी ‘चार्ज’ घेतला. पहिल्याच दिवशी त्यांनी लोकाभिमुख प्रशासनाची ग्वाही दिली असली तरी अमरावतीचे पोलिसिंग त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे, हे विशेष.
पोलीस यंत्रणेला छेद !
शहर आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्रकालीन गस्त, संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी- कर्मचारी, गुन्हे शाखा, डीबीस्कॉड, सीआर मोबाईल, चार्ली कमांडो, खुफियांसह प्रमुख चौकात सेवा देणाऱ्या १५४ वाहतूक पोलिसांचा ताफा तैनात असतो. ‘रिस्पॉन्स टाईम’ कमी करण्यासाठी खास ‘सीआर मोबाईल’ गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या पाठपुराव्याने शहर आयुक्तालयाला मिळाल्यात. रात्रकालीन गस्त आणि साध्या वेशातील पोलिसिंगचा दावाही केला जातो. तथापि एवढा व्यापक ताफा असूनही मुठभर दुचाकी चोरटे पोलीस यंत्रणेला छेद देतात. मग पोलीस करतात तरी काय, असा प्रश्न नागरिकांना पडतो.