परीक्षांच्या तोंडावर कर्मचारी संपावर, विद्यापीठापुढे नवे संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 11:43 AM2023-01-25T11:43:46+5:302023-01-25T11:44:00+5:30

सीबीसीएस हिवाळी परीक्षा आजपासून, परीक्षांच्या नियोजनावर होणार परिणाम

new crisis ahead of Amravati university as Staff on strike ahead of exams | परीक्षांच्या तोंडावर कर्मचारी संपावर, विद्यापीठापुढे नवे संकट

परीक्षांच्या तोंडावर कर्मचारी संपावर, विद्यापीठापुढे नवे संकट

googlenewsNext

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सीबीसीएस हिवाळी-२०२२ नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा बुधवार, २५ जानेवारी ते १६ फेब्रुवारी यादरम्यान होत आहेत. मात्र, विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाकडे प्रलंबित विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी २ फेब्रुवारीपासून परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या सीबीसीएस हिवाळी परीक्षांवर मोठा परिणाम होणार असून, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर परीक्षांची कामे शक्य होणार नाहीत, असा सूर आतापासूनच उमटू लागला आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सीबीसीएस (चाॅइस बेस्ड क्रेडिट सिस्टम) अभ्यासक्रम लागू करून शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू केली. एवढेच नव्हे, तर सर्व अभ्यासक्रमांसाठी हिवाळी २०२२ परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करणारे पहिले विद्यापीठ ठरले आहे. अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत ४०४ महाविद्यालये, बुलढाणा येथील एक मॉडेल कॉलेज आणि अमरावती विद्यापीठाच्या शिक्षण विभागांतर्गत ३३ पीजी विभागांत ‘सीबीसीएस’ अभ्यासक्रम पॅटर्न लागू करण्यात आला आहे. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांत नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या सीबीसीएस अभ्यासक्रमानुसार एकूण ६५ परीक्षा आणि ८५ हजार विद्यार्थी परीक्षा देतील, असे नियोजन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाने केले आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २ फेब्रुवारीपासून परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाबाबत पुढे काय होईल, हे आताच सांगता येणार नाही. मात्र, बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या सीबीसीएस परीक्षांची तयारी करण्यात आली आहे.

- मोनाली तोटे- वानखडे, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ

Web Title: new crisis ahead of Amravati university as Staff on strike ahead of exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.