Coronavirus News: दुसऱ्या लाटेतील नव्या घातक स्ट्रेनचा अमरावतीतून नव्हे, राजस्थानातून उगम; ७० टक्के नमुन्यात बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 06:18 AM2021-04-28T06:18:41+5:302021-04-28T06:20:02+5:30
डिसेंबर २०२० मध्ये सर्वप्रथम नोंद, ७० टक्के नमुन्यात बदल
अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नवा घातक स्ट्रेनसाठी अमरावती हे नाव पुढे आले असले तरी राजस्थान येथे डिसेंबर २०२० मध्येच तो आढळून आला होता. तशी नोंद हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी) यांनी केल्याची माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कोविड-१९ नमुने चाचणी प्रयोगशाळेचे नोडल अधिकारी प्रशांत ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
ठाकरे म्हणाले की, डबल म्युरेअन म्युटंट ‘ई४८४क्यू’ व ‘एल४५२आर’ हे आहेत. यात एकूण १५ म्युरेअन असून, हा विषाणूचा एक भाग आहे. आतापर्यंत सहा म्युरेअन आढळले आहेत. दोन म्युरेअन महत्त्वाचे आहेत. ‘डबल म्युरेअन म्युटंट’ हा डिसेंबर २०२० मध्ये आढळून आला. हा नवा स्ट्रेन नाही. हल्ली ७० टक्के नमुन्यात तो आढळत आहे. त्याचा उगम अमरावतीचा नाही, अशी पुष्टीही ठाकरे यांनी केली.
कोरोना संसर्गाचा वेग वाढला
अमरावती जिल्ह्यात मार्च, एप्रिल या दोन महिन्यांत एक लाखांवर नमुन्यांची चाचणी केली आहे. एका सदस्याला लागण झाली की, संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह आढळते. संक्रमणासह मृत्यूदरही वाढत आहे. प्रत्येक महिन्यात कोरोनाच्या विषाणूत जनुकीय बदल होत आहेत. याबाबत (व्हेरिअंट ऑफ कन्सल्ट) विश्लेषण करण्यात येत आहे. नमुने पुण्याला पाठवित असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंगोली, अकोला येथेही आढळला दुसरा स्ट्रेन
आतापर्यंत ‘डबल म्युरेअन म्युटंट’ हा ग्रीस, यूके येथेही आढळून आला आहे. त्याचा उगम अमरावती येथून झाला, असे म्हटले जात असल्याने विदर्भात भीतीचे वातावरण पसरले असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. दुसरा स्ट्रेन हिंगोली, अकोला येथेही आढळून आला आहे. नागरिकांनी भयभीत होऊ नये, मास्कचा वापर करावा, नियमित हात स्वच्छ धुवावेत, सुरक्षित शारीरिक अंतर ठेवावे आणि कोरोनाला पळवावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.