पोहरा-चिरोडी तरुणाईचे नवे ‘डेस्टिनेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 10:52 PM2018-02-04T22:52:29+5:302018-02-04T22:52:54+5:30
वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे प्रेमीयुगलांना एकांत शोधण्यासाठी जंगलाचा आधार घ्यावा लागतो. प्रेमाचे दोन शब्द बोलावे, आपल्या जिवलगासोबत चार क्षण घालवावे या विचारात हे प्रेमीयुगुल पोहरा बंदी, चिरोडीचे जंगल आणि मालखेड पर्यटन स्थळाचा आधार घेतात.
अमोल कोहळे।
आॅनलाईन लोकमत
पोहरा बंदी : वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे प्रेमीयुगलांना एकांत शोधण्यासाठी जंगलाचा आधार घ्यावा लागतो. प्रेमाचे दोन शब्द बोलावे, आपल्या जिवलगासोबत चार क्षण घालवावे या विचारात हे प्रेमीयुगुल पोहरा बंदी, चिरोडीचे जंगल आणि मालखेड पर्यटन स्थळाचा आधार घेतात. या दोन्ही ठिकाणी गेलेल्या अनेक तरूणींच्या आयुष्याचा रंगच उडाला आहे. या जंगलात वावरणाऱ्या हीन प्रवृत्तीच्या काही नरपशूंच्या वासनेला व विकृत मनोवृत्तीला या तरूणी बळी पडल्या असून या प्रकाराची कुठेही वाच्यता करण्याची हिंमत त्या करीत नाहीत.
पोहरा व चिरोडी, मालखेड पर्यटन स्थळी मुलींचे त्यांच्या मित्रांसोबत प्रेमचाळे सुरू असतात. यामध्ये सुसंस्कृत घरातील मुलींचाही समावेश असतो. या दोन्ही ठिकाणी आलेल्या एकांताची संधी साधून अमरावती-चांदूररेल्वे महामार्गावर प्रेमीयुगुलांचा राबता दिवसेंदिवस वाढतच आहे. पोहरा-चिरोडी घाटामध्ये चालत्या वाहनांवर करीत असलेले अश्लील चाळे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहेत. काही पालकांचे या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. प्रेमी युगुलांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक दिसत आहे. पालकांसाठी हा चिंतेचा विषय ठरला आहे.
भरकटलेली तरूणाई
शाळा-महाविद्यालयांमधून आपल्या मित्रांसोबत दुचाकीवर तोंडाला दुपट्टा बांधून शहरवासीयांची नजर चुकवीत अनेक तरूण चांदूररेल्वे मार्गाने फिरताना दिसतात. दुपारभर मौज करून महाविद्यालयाचा वेळ संपल्यावर त्या तरूणी आपल्या घराच्या दिशेने वळतात. मुले कुठे गेली याचे भान पालकाला राहत नाही. त्यामुळे पालकांनीसुद्धा सजगता बाळगणे ही काळाची गरज झाली आहे.
रविवारी सर्वाधिक धूम
शाळा-महाविद्यालयाच्या नावावर विद्यार्थी-विद्यार्थिनींना मित्रांसमवेत ‘लाँग ड्राईव्ह’ करतात. पोहरा-चिरोडीमार्गावरील निसर्गरम्य सत्याग्रही घाटात युगुलांचे जत्थेच्या जत्थे दृष्टीस पडतात. रविवार व सुट्टीच्या दिवशी घाटातील काही पॉर्इंटवर माना शरमेने खाली घालण्यास लावणारे दृश्य दिसते.
प्रतिबंध आवश्यक
याच घाटात प्रेमीयुगुलांची अनेकदा छेडखानी झाली. यावर वेळीच प्रतिबंध घातला नाही तर गंभीर प्रकाराला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. सकाळपासून सायंकाळच्या सात वाजेपर्यंत असला प्रकार या मार्गावर आढळते. याआधी तर काही चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला लावून बसत असल्याचे दिसून आले होते.
जंगलात हिंस्त्र पशू
प्रेमीयुगुल बेभान फिरताना दिसतात. पोहरा-चिरोडी जंगल हे शहरातील प्रेमीयुगुलांकरिता मनमोकळे रान ठरत असल्याने या जंगलात प्रेमीयुगुलांची गर्दी वाढत आहे. एकांतवास मिळण्याच्या दृष्टीने झाडाझुडपांच्या आडोशात बसणाºया प्रेमीयुगुलांच्या मनात जंगलात पट्टेदार वाघ सुटल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.