सायन्सकोर बनले नवे डम्पिंग ग्राऊंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:40 AM2019-02-08T00:40:07+5:302019-02-08T00:40:28+5:30
स्थानिक आमदार सुनील देशमुख यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सायन्सकोर मैदानाला महापालिकेने सध्या डम्पिंग ग्राऊंड बनविले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील व अगदी बसस्थानकालगत असलेले सायन्सकोर मैदान शहराचे वैभव म्हणून ओळखले जाते.
इंदल चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक आमदार सुनील देशमुख यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सायन्सकोर मैदानाला महापालिकेने सध्या डम्पिंग ग्राऊंड बनविले आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील व अगदी बसस्थानकालगत असलेले सायन्सकोर मैदान शहराचे वैभव म्हणून ओळखले जाते. हे मैदान अवाढव्य असल्याने तेथे दिग्गज नेत्यांच्या सभांव्यतिरिक्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मैदानाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे आहे. कुठलेही कार्यक्रम येथे घेण्यापूर्वी जिल्हा परिषदेत रीतसर पावती फाडून परवानगी घेतली जाते. हे मैदान वैशिष्ट्यपूर्ण असल्याने शहराची शान मानली जाते. मात्र, काही दिवसांपासून शहरातील चार प्रभागांतील रोज निघणारा कचरा या मैदानात आणून टाकला जात आहे. यासाठी १२ हायड्रोलिक आॅटोंचा वापर होत आहे. तेथे जमा झालेला कचरा काही वेळाने वलगाव येथील कचरा विलगीकरण स्थळी मोठ्या वाहनांनी पोहचविले जाते, अशी माहिती स्वच्छता कामगारांनी दिली. तथापि, वलगाव येथे कचरा विलगीकरण स्थळ नेमके कुठे, याचे उत्तर त्याला देता आले नाही.
शहरातील विविध प्रभागातील कचरा ओला व सुका असा स्वतंत्ररीत्या संकलित करून तो प्रभागातील कंटेनरमध्ये वेगवेगळा टाकावा व त्यानंतर कंत्राटदाराने तो वेगवेगळा केलेला कचरा त्यांच्या ट्रकमधून ओला व सुका असाच स्वतंत्ररीत्या सुकळी कम्पोस्ट डेपोवर घेऊन जावा, अशी कचरा संकलन व वहनाची पद्धत आहे. त्यासाठी महापालिकेचे स्वतंत्र धोरणसुद्धा आहे. महापालिकेचा स्वच्छता विभाग त्या धोरणाला तिलांजली देत असल्याचा प्रकार सायन्सकोरवर नव्याने बनत असलेल्या डम्पिंग ग्राऊंडच्या निमित्ताने उघड झाला आहे.
नागरिकांना दुर्गंधीचा त्रास
बसस्थानक परिसरातून दररोज सकाळी हजारो नागरिक ये-जा करतात. रुख्मिणीनगर बाजूलाच असल्याने प्रतिष्ठितांसह मालटेकडीवर फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सकाळपासूनच मैदान कचरा टाकण्यास सुरुवात होते. वराह कचºयावर ताव मारत असल्याने तो विखुरला जातो.
अधिनस्थ यंत्रणेला विचारणा करू. सायन्सकोर मैदान जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहे. तेथे कचरा टाकण्यासंदर्भात जिल्हा परिषदेशी कुठलाही करार करण्यात आलेला नाही.
- डॉ. विशाल काळे
वैद्यकीय आरोग्य अधिकारी महापालिका
कचरा पारधी बांधवांकडून पन्नी वेचण्याकरिता, वराहांद्वारा विखुरला जातो. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन होऊन आजाराला निमंत्रण मिळत आहे. यावर संबंधितांसह नागरिकांनी नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
- डॉ. अतुल यादगिरे कर्करोगतज्ज्ञ
महापालिकेने परवानगी मागितलेली नाही. ती आम्ही दिलीही नसती. हा प्रकार थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांशी वारंवार पत्रव्यवहार केला. अखेर सिटी कोतवाली ठाण्यात तक्रारसुद्धा दिली आहे.
- जयंत देशमुख
सभापती, शिक्षण, जिल्हा परिषद