अमरावती विद्यापीठात पीएच.डी.चे नवीन चारशे गाइड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 05:40 PM2019-03-18T17:40:26+5:302019-03-18T17:40:40+5:30
संकेत स्थळावर यादी प्रसिद्ध : संशोधन केंद्रावर २० मार्चपर्यंत प्रवेश घेण्याच्या सूचना
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सोमवारी पीएच.डी.चे नवे ४०० गाइड घोषित केले आहेत. या गाइडची यादी विद्यापीठाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २० मार्चपर्यंत संशोधन केंद्रात पीएच.डी.करिता प्रवेश घेणे अनिवार्य आहे.
केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) ने नव्या अध्यादेशाद्वारे कुलगुरूंना अधिकार बहाल केले असून, त्यानुसार अधिसूचना जारी केली आहे. विद्यापीठ अंतर्गत १०३ संशोधन केंद्रे निर्माण करण्यात आली असून, ४० केंद्रे नव्याने निर्माण होतील, अशी तयारी चालविली आहे. २० मार्चपर्यत पीएच.डी. प्रवेश झाल्यानंतर १५ एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित केला जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया अध्यादेशानुसार केली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना कोर्सवर्क सुरू करता येणार आहे.
यूजीसीची मान्यता असलेल्या विद्यापीठातून एम.फिल. पदवीधारकांना पीएच.डी. कोर्सवर्कमधून सूट देण्याचा निर्णय झाला आहे. नव्या निकषात चार फॅकल्टी असतील. संशोधन केंद्रावर प्रवेश घ्यावा लागणार आहे. तेथेच प्रवेश प्रक्रिया व शुल्काचा भरणा होईल. त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील. निवड झालेल्या उमेदवारांची कोर्सवर्क शुल्क घेऊन प्रवेश निश्चित केला जाणार आहे. संशोधन केंद्राला निवड यादी १० दिवसांत विद्यापीठाकडे सादर करावी लागणार आहे. त्यानंतर विद्यापीठाचे नामांकन शुल्क आणि अर्ज भरून ते २५ एप्रिलपर्यंत संशोधन केंद्रांना विद्यापीठात पाठवावे लागणार आहे. पीएच.डी पदवीसंदर्भात नव्या अध्यादेशाने कुलगुरूंना अधिकार बहाल केले आहेत.
१ डिसेंबरपर्यंत चालणार पीएच.डी. प्रवेश
पहिल्या टप्प्यात २० मार्चपर्यंत पीएच.डी. प्रवेश देण्याबाबतची तयारी विद्यापीठाने चालविली आहे. त्यानंतर दुसºया टप्प्यात नव्याने ३१ मे रोजी गाइडची यादी जाहीर केली जाणार आहे. यावेळी इच्छुकांना १ डिसेंबर २०१९ पर्यंत संशोधन केंद्रावर पीएच.डी.करिता विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल, असे विद्यापीठ पीएच.डी. सेलने कळविले आहे.
‘‘ नव्या अध्यादेशानुसार पीएचडी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २० मार्चपर्यंत मान्यताप्राप्त संशोधन केंद्रांवर अर्ज सादर करावे लागतील. त्यानंतर ३१ मे रोजी संशोधकांची यादी प्रसिद्ध होणार असून, १ डिसेंबर २०१९ पर्यंत प्रवेश घेता येईल.
- सुजय बंड, उपकुलसचिव, पीएच.डी. सेल, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ