भक्ती, संस्कारांच्या बळावर घडेल नवी पिढी
By Admin | Published: October 31, 2015 01:08 AM2015-10-31T01:08:18+5:302015-10-31T01:08:18+5:30
भावी पिढी संस्कारक्षम घडवायची असेल तर महिलांनी आपल्या अपत्यावर भक्ती व प्रार्थनेचा संस्कार करावा तरच सक्षम पिढी तयार होईल,
पुष्पा बोंडे : गुरूकुंजात महिला संमेलनाचे उद्घाटन
गुरुकुंज मोझरी : भावी पिढी संस्कारक्षम घडवायची असेल तर महिलांनी आपल्या अपत्यावर भक्ती व प्रार्थनेचा संस्कार करावा तरच सक्षम पिढी तयार होईल, असे प्रतिपादन पुष्पा बोंडे यांनी ४७ व्या पुण्यतिथी महोत्सवातील महिला संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून केले. यावेळी ‘मी मंजुळा बोलतेय’ हा लक्षवेधी कार्यक्रम महिला संमेलनाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
याप्रसंगी मंचावर हर्षलकुमार चिपळूनकर, श्रीमती उषाताई हजारे, सरपंच विद्या बोडखे, अनुराधा प्रवीण पोटे, वसुंधरा अनिल बोंडे, पद्मा दिलीप निंबोरकर, शैलजा गावंडे, भारती पाचघरे, शशीकला नागमोते, आशा बोरडकर, श्रीमती द्वारकाबाई गोहत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. बोंडे पुढे म्हणाल्या की, युवापिढीवर भक्ती व प्रार्थनेचा संस्कार नसल्यामुळे त्यांच्यातील वासना वारंवार जागृत होऊन त्यांच्यात विकृती निर्माण झालेली आहे. म्हणून महिलांनी स्वत:च्या सक्षमीकरणाबरोबर आपल्या पाल्यावर संस्कार करावे. शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी असे तुकाराम महाराज म्हणतात. त्यामुळे महिलांनी गर्भावस्थेतच स्वत:वर चांगले संस्कार करून घेणे महत्त्वाचे आहे. माणूस वयाने किती मोठा झाला याला महत्त्व नसून त्यांच्यात सद्गुण किती आहे हे महत्त्वाचे आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक जण समजून घेत होता. परंतु आता विभक्त कुटुंब पद्धती वाढल्यामुळे कुटुंबातील आपुलकीची भावना कमी झाली असून नैराश्य वाढले आहे. आजची युवापिढी विज्ञानाने घेतलेल्या झेपमुळे सतत मोबाईलवर असतात. परंतु हे वलय भौतिक सुखाचे असून अंतरंगात ध्यान व चिंतनाचे संस्कार होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने माणूस निर्माण होणार नाही. माणूस निर्माण होण्यासाठी डोळसबुद्धीने ग्रामगीतेचे संस्कार आचरणात आणावे लागेल. या मेळाव्याला वसुधा बोंडे, शैलजा गावंडे, भारती पाचघरे, उषाताई हजारे यांनीही मार्गदर्शन केले. या मेळाव्यात उदारामजी शेलोटकर व सहपत्नीक ऋतुजा ठाकरे, श्याम देऊळकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ऋतुजा भोयर हिने ‘मी मंजुळा बोलतेय’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मेळाव्याचे प्रास्ताविक विभा वाडेकर यांनी केले. संचालन सविता तायडे व आभार राधिका चौधरी यांनी केले.