नव्या कैद्यांचा स्वतंत्र बराकीत मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 05:00 AM2020-05-28T05:00:00+5:302020-05-28T05:00:01+5:30
हल्ली कारागृहात जुने १३२१ पुरुष-महिला बंदीजन आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन-प्रशासन स्तरावरून आलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्यासाठी कारागृह प्रशासनही सरसावले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गर्दी कमी करण्यासाठी अमरावती कारागृहातून काही दिवसांपृूर्वी १५० कैद्यांना घरी सोडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणूने संपूर्ण जग विळख्यात घेतले आहे. यातून कैदीसुद्धा सुटलेले नाहीत. त्यांना संसर्ग टाळण्यासाठी ‘लॉकडाऊन’च्या काळात न्यायालयाच्या आदेशानुसार, मध्यवर्ती कारागृहात येणाऱ्या नव्या कैद्यांना स्वतंत्र बराकीत ठेवण्यात येत आहे. कारागृहात येण्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी करूनच प्रवेश दिला जात आहे.
हल्ली कारागृहात जुने १३२१ पुरुष-महिला बंदीजन आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन-प्रशासन स्तरावरून आलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्यासाठी कारागृह प्रशासनही सरसावले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गर्दी कमी करण्यासाठी अमरावती कारागृहातून काही दिवसांपृूर्वी १५० कैद्यांना घरी सोडण्यात आले. याशिवाय ‘लॉकडाऊन’च्या काळात २३ मार्च ते २७ एप्रिल यादरम्यान आलेल्या नवीन कैद्यांचा स्वतंत्र बराकीत मुक्काम आहे. जुन्या कैद्यांसोबत या नव्या कैद्यांची गाठभेट होणार नाही, अशी दक्षता कारागृह प्रशासनाने घेतले आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळात गुन्हेगारीची प्रमाण कमी असले तरी कोरोनाच्या दहशतीमुळे नव्या कैद्यांबाबत सोशल डिस्टन्सिंगमुळे अंतर राखूनच कारभार हाताळला जात आहे.
नव्या कैद्यांचे जेवण, नाष्टा, विश्रांती, आंघोळ आणि वास्तव्य आदी बाबी स्वतंत्रपणे ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे जुन्या कैद्यांना कोरोना संसर्ग होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.
कारागृहात क्वारंटाईन कक्ष स्थापन
आरोग्य यंत्रणेने एखाद्या कैद्याला कारागृहातच क्वारंटाइन करण्याच्या सूचना दिल्यास तशी व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. कारागृहात येणाऱ्या प्रत्येक नव्या कैद्यात सर्दी, खोकला, ताप, घशात खवखव, श्वसनास त्रास आदी लक्षणे असल्यास आरोग्य तपासणी करूनच प्रवेश दिला जात आहे. क्वारंटाइन कक्षात अद्याप एकही कैदी नाही.
‘लॉकडाऊन’च्या काळात येणाऱ्या सर्वच कैद्यांना स्वतंत्र बराकीत ठेवले आहे. जुन्या कैद्यांसोबत नव्या कैद्यांचा काहीही संपर्क नाही. नव्या कैद्यांची दिनचर्या वेगळी आहे. तसे वरिष्ठांचे आदेश आहेत.
- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती