नवीन खोलापुरी गेट ठाणे धूळखात
By admin | Published: January 30, 2017 01:15 AM2017-01-30T01:15:36+5:302017-01-30T01:15:36+5:30
तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या खोलापुरी गेट पोलीस
लाखोंचा खर्च : पोलीस विभागाचे दुर्लक्ष, संरक्षक भिंत तुटली
अमरावती : तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीला उतरती कळा लागली आहे. लाखोंचा खर्च करून ही इमारत बांधण्यास वर्ष उलटले. मात्र, आजही ती इमारत धूळखात पडली आहे. पोलीस विभागाचे या इमारतीकडे दुर्लक्ष होत आहे.
इमारतीच्या सरंक्षणभिंतीचा एक कोपरा तुटला असून त्या भगदाडातून रहदारी देखील सुरु झाली आहे. इतकेच नव्हे तर परिसरातील नागरिकांनी ठाण्याच्या आवाराला पार्किंग झोन बनविले आहे. याकडे पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यकाळात हे पोलीस ठाणे मंजूर झाले होते. त्यानंतर या ठाण्याच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन तत्कालीन पोलीस आयुक्त अजित पाटील यांच्या कार्यकाळात झाले होते. पोलीस कल्याण निधीतून ३५ ते ४० लाख रूपये खर्च करून ठाण्याची नवीन इमारत बांधण्यात आली. मात्र, या इमारतीचे लोकार्पण झालेच नाही. परिणामी सद्यस्थितीत ही इमारत धूळखात पडली आहे. नवीन इमारत सुविधाजनक नसून तेथे महिला कक्ष नाही, फिर्यादीसाठी बसण्याची जागा नाही, बंदीगृह देखील नसल्याने ही इमारत कुचकामी ठरली आहे. उपरोक्त जागेवर पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी काही राजकीय नेत्यांद्वारे प्रचंड विरोध झाल्याने पोलिसांनीही या इमारतीची हवी तशी दखल घेतली नाही. त्यामुळे सध्या ही इमारत केवळ शोभेची वस्तू बनली आहे. या नवीन ठाण्याच्या आवारात नागरिकांची वाहने पार्क केली जात आहेत. पोलीस कल्याण निधीतील लाखोंची रक्कम या बांधकामासाठी गुंतवण्यात आली. मात्र, इमारत कोणत्याच उपयोगात आलेली नाही. पोलीस विभागाने तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे.
खोलापुरी गेट ठाण्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम होऊन तीन वर्षे झालीत. मात्र, काही स्थानिक नेत्यांनी इमारतीला विरोध दर्शविला. त्यामुळे ठाण्याचे स्थांनातरण झाले नाही. वरिष्ठस्तरावर ठाण्याचा मुद्दा आहे.
- अनिल कुरुळकर,
पोलीस निरीक्षक,
खोलापुरी गेट पोलीस ठाणे.