मॉडेल रेल्वे स्थानकावर गुरुवारपासून नव्या तिकीट बुकिंग केंद्राला प्रारंभ
By admin | Published: May 9, 2016 12:05 AM2016-05-09T00:05:36+5:302016-05-09T00:05:36+5:30
येथील मॉडेल रेल्वे स्थानकावर गुरुवारी १२ मेपासून नवीन तिकिट बुकिंग केंद्राला प्रारंभ केला जात आहे.
जयस्तंभकडून येणाऱ्यांना सुविधा : आरक्षण तिकीट मिळणार
अमरावती : येथील मॉडेल रेल्वे स्थानकावर गुरुवारी १२ मेपासून नवीन तिकिट बुकिंग केंद्राला प्रारंभ केला जात आहे. या केंद्रातून रेल्वे गाड्यांचे आरक्षण व सामान्य तिकीट मिळणार आहे. जयस्तंभ चौकाकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी ते सोयीचे ठरणारे आहे.
मॉडेल रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक रेल्वे आरक्षण केंद्र साकारण्यात आले. मात्र जयस्तंभ चौक, जवाहरगेट, शाम चौक, जुने कॉटन मार्केट, चित्रा चौक, इतवारा बाजार आदी भागातून ये-जा करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना वेढा मारून मॉडेल रेल्वे स्थानक गाठावे लागत होते. परिणामी जयस्तंभ ते रेल्वेस्थानक मार्गावर रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त तिकीट बुकिंग केंद्र साकारले आहे. भवदिव्य असे हे तिकीट आरक्षण केंद्र निर्माण केले. मात्र मनुष्यबळाअभावी धूळखात पडले होेते. मात्र रेल्वे प्रशासनाने अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकावर वाढती प्रवासीे संख्या बघता जयस्तंभ मार्गे येणाऱ्या प्रवाशांसाठी नवे तिकीट बुकिंग केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षण तिकिटाचे केंद्र दोन पाळीत सुरू राहणार आहे. तसेच तीन पाळीत विना आरक्षण तिकिट केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन तिकीट आरक्षण बुकिंग केंद्रात शिल्लक असलेली तांत्रिक कामे पूर्ण करण्याठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या वरिष्ठांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. नवीन तिकीट बुकिंग केंद्रात लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी वरिष्ठांनी होकार दिला आहे. या नवीन तिकीट बुकिंग केंद्रामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आरक्षण तिकिटाची रांग होईल आता कमी
मॉडेल रेल्वे स्थानकावर गाड्यांचे आरक्षण मिळविण्यासाठी रात्रीपासून दलाल अथवा प्रवाशांच्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे. परंतु जयस्तंभ चौकाकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन तिकीट बुकिंग केंद्र सुरू होत असल्याने मॉडेल रेल्वे स्थानकावरील बुकिंग केंद्रावर नक्कीच रेल्वे तिकिट आरक्षणाची रांग कमी होईल.
रेल्वे तिकीट आरक्षण केंद्र गुरुवारपासून सुरू केले जाणार आहे. याच केंद्रात तांत्रिकदृष्ट्या असलेली कामे पूर्णत्वास आणली जाईल. वरिष्ठांच्या आदेशानुसार हे केंद्र सुरू करण्यात येत आहे.
- व्ही. डी. कुंभारे,
वाणिज्य निरीक्षक,
रेल्वे स्थानक अमरावती