नया वाठोडा-नेरपिंगळाई मार्ग झाला जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:09 AM2021-06-28T04:09:59+5:302021-06-28T04:09:59+5:30
मोर्शी : नया वाठोडा ते नेरपिंगळाई या मुख्य मार्गावरून दररोज हजारो नागरिकांचा प्रवास सुरू असतो. हा मार्ग जीवघेणा ...
मोर्शी : नया वाठोडा ते नेरपिंगळाई या मुख्य मार्गावरून दररोज हजारो नागरिकांचा प्रवास सुरू असतो. हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. या मार्गावरील ढवळ्या नदीवरील जमीनदोस्त पुलावर ठिकठिकाणी लोखंडी सळाखी उघडल्या पडल्या आहेत. मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. पर्यायी मार्गाअभावी नागरिकांना जीव मुठीत घेऊन याच मार्गावरून प्रवास करावा लागत आहे, हे विशेष.
नया वाठोडा- नेरपिंगळाई मार्गावरील ढवळ्या पुलाचे बांधकाम विभाग व जिल्हा परिषद अधिकाराखाली येतो. हा पूल कितीतरी वर्षांपासून पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे. पूल खचल्याने आता नदीतील पाणी रस्त्यावरून वाहत आहे. नया वाठोडा गावालगत अनेक लहान-मोठी गावे आहेत. या सर्व गावांना मूलभूत सोई-सुविधांकरिता नेरपिंगळाई एकमात्र पर्याय असून हाच रस्ता आहे. सदर मार्ग व्यवस्थित व सुविधापूर्ण असायला पाहिजे. मात्र, या रस्त्यावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले असून, पूल जमीनदोस्त झाल्याने वाहनाधारकांना केव्हाही धोका होऊ शकतो. लोखंडी सळाखी जीवघेण्या ठरत आहे.